ड्युटी लावण्यावरून ‘आयएमए’मध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:51 AM2020-06-17T11:51:44+5:302020-06-17T11:51:55+5:30
आज बैठक : जिल्हाधिकारी कार्यालयातच आपसात झाला गोंधळ
जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनमधील आपसातील वाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी चव्हाट्यावर आले़ कोविडसाठी गणपती रुग्णालयात फिजिशन व भुलतज्ञांचीच नेमणूक का केली गेली? या विषयावरून हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला़ याबाबत फिजिशियन व भुलतज्ञ यांची बुधवारी सकाळी ९ वाजता आयएमए सभागृहात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे़
कोविडसाठी अधिग्रहीत गणपती रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टर्सची आॅनकॉल २४ तास ड्युटी लावण्यात आल्याने हा प्रकार अमानवीय असल्याचे सांगत यावर तोडगा काढावा यासाठी औषधवैद्यक शास्त्राचे डॉक्टर्स तसेच भूलतज्ञ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी पत्र दिले होते़ त्यानुसार डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते़ चर्चेसाठी येत असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला डॉक्टर्सनी समस्या मांडल्या़ बाहेर क्वारंटाई कसे राहावे, अशा विविध समस्या मांडत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जसा सोयीचा वेळ ठरवून घेतला आहे तसाच वेळ कोविडसाठीच्या खासगी रुग्णालयात का नको, तसेच सिव्हीलमध्ये काम करणाऱ्यांनी इकडे काम करावे, असा सूर उमटल्यानंतर आयएमएच्या पदाधिकाºयांसोबत हा वाद झाला़ यात डॉ़ राधेश्याम चौधरी यांनी मध्यस्ती करीत हा वाद सोडविला़ कोविडसाठी छातीच्या आजाराचे तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ यांचाच अधिक उपयोग असल्याने त्यांच्या ड्युटी लावण्यात आल्याचेही सांगण्यात येत होते़ आॅन कॉल २४ व सलग पाच दिवस कोविडच्या कालावधीत शक्य होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़
बैठक घेऊन ठरवा... शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आयएमच्या डॉक्टर्सनी याबाबत बैठक घेऊन नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉक्टरांमध्ये भीती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वुद्धेच्या मृत्यूनंतर डॉक्टर्स कारवाई करण्यात आल्याने डॉक्टर्समध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही एका पदाधिकाºयांनी सांगितले़ प्रामाणिक काम करूनही कारवाई होत असल्याने डॉक्टर्समधून असा सूर उमटत असून अशा वातावरणात काम कसे करावे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे़