जामठी येथे अंत्यविधीच्या जागेवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:57 AM2020-09-21T00:57:41+5:302020-09-21T00:58:02+5:30
जामठी येथे बौद्ध समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी करण्याच्या जागेवरून वाद झाला.
विकास पाटील
जामठी, ता.बोदवड : जामठी येथे बौद्ध समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी करण्याच्या जागेवरून वाद झाला. संबंधितांनी ग्रामपंचायतीसमोर खड्डे खोदून अंत्यविधी करण्याची तयारी करीत असतानाच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर वाद मिटला. रविवारी दुपारपर्यंत हा वाद सुरू होता.
बौद्ध समाजातील एका १२ वर्षाच्या मुलीचे रविवारी निधन झाले. पूर्वापार आतापर्यंत गावाजवळील बेटावद रस्त्यावरील एका जागेवर अंत्यविधीला खड्डे खोदण्यासाठी समाजबांधव सकाळी गेले. मात्र देवराम बळीराम माळकर व अशोक नामदेव माळकर या शेतकऱ्यांनी ही जागा आपली असल्याचा दावा केलाल तर दुसरीकडे या शेतकऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप बौद्ध समाजबांधवांनी केला. यामुळे बौद्ध समाजबांधवांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालय गाठले व कार्यालयासमोरच अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. यामुळे येथे हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली. ही माहिती पोलिसांना समजताच पोलीस ताफा जामठीमध्ये दाखल झाला.
पोलिसांनी शेतकºयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकरी, जमावात शाब्दीक चकमक उडाली. अखेर पूर्वीच्याच जागी खड्डे खोदण्याचा निर्णय झाला आणि पोलिसांनी प्रकरण शांत केले.
मुलीचा अंत्यविधी २१ रोजी सकाळी ९ वाजता करणार आहे. त्या मुलीचे वडील व आजी बाहेरगावी मुंबईवरून येत असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.
कोण, काय म्हणाले?
आमची शेती वडिलोपार्जित शेती करत असून, आम्ही कुठेही अतिक्रमण केले नाही व स्मशानभूमीस आमचा विरोध नाही. तसेच या जागेसंदर्भात पुरावे असल्यास आम्ही देण्यास तयार आहे. त्यांनी शेतीची मोजणी करून घ्यावी.
-अशोक नामदेव माळकर, जागा मालक शेतकरी, जामठी
अंत्यविधीसाठी परंपरेप्रमाणे पूर्वीच्या जागेवर खड्डा करण्यासाठी गेले असता शेतकºयाने आम्हाला विरोध केला. आमच्या स्मशानभूमीच्या जागेअभावी आम्ही ग्रामपंचायतीसमोर खड्डा करून दफन क्रिया करत होतो. पोलिसांनी मध्यस्थी करून शेतात खड्डा केला.
-सुरेश सुरवाडे, समाज बांधव, जामठी