कानबाईच्या विसर्जनावेळी झालेला वाद बेतला जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:32 PM2019-08-14T12:32:50+5:302019-08-14T12:33:39+5:30
शिवाजीनगरातील तरुणाचा सुरतमध्ये खून : दुचाकीवरून आले होते हल्लेखोर
जळगाव : शिवाजीनगरातील खडके चाळ परिसरात वास्तव्यास असलेला रितेश सोमनाथ शिंपी (वय-१८) याचा सोमवारी सुरतमधील दिंडोली येथे कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना अज्ञात युवकांशी वाद झाला़ त्यानंतर त्या अज्ञात युवकांनी रितेश याच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले़ दरम्यान, मंगळवारी पहाटे रूग्णालयात उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली़ दरम्यान, याप्रकरणी दिंडोली पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रितेश शिंपी हा शिवाजीनगरातील खडकेचाळ परिसरात आई-वडील तसेच मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता़ तर शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता़ रविवारी आणि सोमवारी कानुबाईचा उत्सव असल्यामुळे रितेश हा सुरतमधील दिंडोली येथील मावशीकडे रविवारी सकाळी आला होता़ कानुबाईचा उत्सव झाल्यानंतर सोमवारी विसर्जन मिरवणूक होती़
त्यामुळे सोमवारी सकाळी रितेश हा नातेवाईकांसह कानुबाईच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता़
दरम्यान, दुपारच्या सुमारास मिरवणुकीत नाचत असताना रितेश याची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांशी धक्काबुक्की झाली़ त्यामुळे वाद होऊन बाचाबाची झाली़
अन् पोटात खोलवर रूतवला चाकू
रितेश आणि त्या दोन युवकांमध्ये वाद झाल्यानंतर हाणामारी झाली़ आणि कुणाला कळण्याच्या आतच दोन युवकांमधील एकाने चाकूने रितेशच्या पोटात वार केला़ वार इतका जबर होता की, चाकू पोटात खोलवर रूतल्यामुळे चाकूसहीत रितेश यास रूग्णालयात हलविण्यात आले़
मंगळवारी पहाटे मृत्यू
पोटात खोलवर चाकू रूतल्यामुळे रितेश हा गंभीर जखमी होता़ त्यातच प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते़ दरम्यान, मंगळवारी रितेश याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला़ याप्रकरणी सुरतमधील दिंडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच प्रेम प्रकरणातून या युवकांकडून रितेश याच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची मात्र, चर्चा ऐकण्यात आली आहे़ रितेश याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे़