‘रेमण्ड’ पूर्वपदावर! सहाशेवर कामगार हजर; आजपासून तीन सत्रात उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 07:36 PM2023-03-03T19:36:54+5:302023-03-03T19:37:18+5:30
‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद आठव्यादिवशी शमला असून शुक्रवारी सहाशेवर कामगारांनी कामावर हजेरी लावली आहे.
कुंदन पाटील
जळगाव : ‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद आठव्यादिवशी शमला असून शुक्रवारी सहाशेवर कामगारांनी कामावर हजेरी लावली आहे. त्यामुळे शनिवारपासून तीन शिफ्टमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी कामगार मंत्र्यांनी बोलावलेली बैठक अचानक रद्द झाल्याने या वादावर कुठलीही चर्चा झाली नाही.
शुक्रवारी कामगारांना सेवेत हजर राहण्यासंदर्भात ‘रेमण्ड’ने अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार ५७५ कायमस्वरुपी सेवेत असणाऱ्या कामगारांसह ३०० कंत्राटी कामगार हजर झाले. त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतल्यानंतर शुक्रवारी एका शिफ्टमध्ये कंपनीत उत्पादनाची निर्मिती करण्यात आली. शनिवारी तीनही शिफ्टमध्ये उत्पादन सुरु राहणार असल्याची माहिती कंपनीच्या सुत्रांनी दिली.
मुंबईतील बैठक रद्द
दि.३ रोजी दुपारी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ‘रेमण्ड’च्या कामगारांच्या नव्या वेतन करारासंदर्भात बैठक बोलावली होती. मात्र कामगार मंत्र्यांचे खासगी सचीव गोपीचंद कदम यांनी सदरची बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. बैठकीची दिनांक आणि वेळ यशावकाश कळविण्यात येणार असल्याचे कदम यांनी एक पत्रक काढून माहिती जारी केली आहे.