जि. प.कडून अखेर १८ गाळेधारकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:24+5:302020-12-27T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जळगाव शहरातील १८ गाळ्यांची कराराची मुदत संपून १७ वर्षे उलटूनही ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जळगाव शहरातील १८ गाळ्यांची कराराची मुदत संपून १७ वर्षे उलटूनही ती खाली न केल्याने व भाडे न भरल्याने अखेर या १८ ही गाळेधारकांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या. आठ दिवसात गाळे खाली करा, अन्यथा पोलिसांच्या मदतीने खाली करून घेऊ, असा इशारा देण्यात आला आहे.
बेंडाळे चौकातील अल्पबचत भवनातील जि. प. मालकीच्या २० पैकी १८ गाळेधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १ डिसेंबरपर्यंतची त्यांना मुदत देण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये थकल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. २००३ मध्ये करार संपल्यानंतर मध्यंतरी हे गाळेधारक न्यायालयात गेले होते. न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, २०१९ मध्ये दोन गाळे न्यायालयाने जिल्हा परिषदेला खाली करून दिले होते. अखेर या प्रकरणात पुन्हा कायदेशी सल्ला घेण्यात आल्यानंतर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.
दुकानावर चिकटवल्या नोटिसा
जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करण्यासाठी येत असताना काही गाळेधारकांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी दुकान बंद केले होते. मात्र, अशांच्या पाच दुकानांवर अधिकाऱ्यांनी या नोटिसा चिकटवल्या असून याचे चित्रीकरणही केले आहे.
नियमबाह्य पोटभाडेकरू ठेवले
करारानुसार मुदत संपल्यानंतर गाळे हस्तांतरित करण्याचे आदेश असताना, शिवाय पोटभाडेकरी ठेवणे नियमात नसतानाही १४ गाळेधारकांनी पोटभाडेकरू ठेवल्याचे समोर आले आहे. येत्या १ डिसेंबर रोजी गाळे खाली न केल्यास ते पोलीस संरक्षणात खाली करण्यात येतील, त्यानंतर वसुलीसाठी योग्य कायदेशील सल्ला घेऊन मालमत्तांवर बोजा चढवायचा की, अन्य कारवाई करायची याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद येवले यांनी सांगितले.
अशी आहे थकबाकी
रेडिरेकनर दरानुसार २००३ पासून भाडे वसूल करण्यात येणार आहे. यात प्रत्येकी सुमारे २५ लाख त्यावर १८ टक्के व्याज अशी रक्कम या गाळेधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे. अशी एकत्रित ही रक्कम ५ कोटी रुपयांच्या वर जात आहे. येवढी वसुली करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.
यांना बजावल्या नोटिसा
गाळा क्रं. १ मूळ भाडेकरू - निवृत्ती पुंडलिक राणे, पोट भाडेकरू- नथ्थू रामकृष्ण महाजन,
गाळा क्रं. २ मूळ भाडेकरू- दिलीप हस्तीमल चोपडा, पोट भाडेकरू - संजयकुमार सुभाषचंद्र मेहता
गाळा क्रं : ३ मूळ भाडेकरू -प्रमोद अमृतराव पाटील
गाळा क्रं : ४ मूळ भाडेकरू - साधोराम गोपालदास पंजवाणी, पोटभाडेकरू हरिशकुमार सुदामलाल प्रथ्यानी
गाळा क्रं : ५ मूळ भाडेकरू - मे ट्रायडंट स्टिल लि., पोटभाडेकरू - चंदुलाल प्रभुदास उदासी
गाळा क्रं : ६ मूळ भाडेकरू -सुशीलकुमार सुभाषचंद्र मेहता, पोटभाडेकरू - मोहम्मद फैजल, अ. गफार मलिक
गाळा क्रं : ७ मूळ भाडेकरू - चंदक्रांत गणपत पाटील, पोटभाडेकरू - राजेश छबीलदास खडके
गाळा क्रं : ८ मूळ भाडेकरू - अशोककुमार जसराम मुंदडा, पोटभाडेकरू - मोहम्मद फैजल, अ. गफार मलिक
गाळा क्रं : ९ मूळ भाडेकरू -देविचंद हिरचंद जैन, पोटभाडेकरू - रमणकुमार रघुनाथ छाजेड
गाळा क्रं : १० मूळ भाडेकरू - महेंद्र दयाराम चौधरी, पोटभाडेकरू - हरिष देवराम चौधरी,
गाळा क्रं : ११ मूळ भाडेकरू -मास फार्मास्युटीकल्स प्रा. लि, पोट भाडेकरू - प्रमोद अमृतराव पाटील
गाळा क्रं : १२ मूळ भाडेकरू - प्रमोद अमृतराव पाटील
गाळा क्रं : १४ मूळ भाडेकरू -साधोराम गोपालदास पंजवाणी, पोटभाडेकरू -मनोज कुमार कन्हैयालाल नथाणी
गाळा क्रं : १६ मूळ भाडेकरू -पंडित विश्वनाथ मराठे, पोट भाडेकरू रमाकांत लकडू शेळके
गाळा क्रं : १७ मूळ भाडेकरू -अनिता संजयकुमार मेहता, पोटभाडेकरू - मनोजकुमार कन्हैयलाल नाथाणी
गाळा क्रं : १८ मूळ भाडेकरू -चिंधु सुका महाजन,
गाळा क्रं : १९ मूळ भाडेकरू -मे. ट्रायडंट स्टील प्रा. लिमिटेड, पोट भाडेकरू बिरदीचंद जैन
गाळा क्रं : २० मूळ भाडेकरू - सई मोहम्मद यासीन