जि. प. स्थायीच्या सभेत ११ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:26+5:302021-03-16T04:17:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत ११ विषयांना मंजुरी देण्यात आली. मागची तहकूब आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत ११ विषयांना मंजुरी देण्यात आली. मागची तहकूब आणि नियमित अशा दोन सभा तासाभरात घेण्यात आल्या. ऑनलाईन सभेत अनेक व्यत्ययांचा सामना सदस्य व अधिकाऱ्यांना करावा लागला.
जामनेर, पाचोरा, पारोळा यावल या ठिकाणच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या वाहन निर्लेखन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यासह हातपंपाचे जुने साहित्य, पाईप, सुटे भाग या भंगाराचा ई-लिलाव करण्यासाठी निर्लेखनास मंजुरी देण्यात आली. नगरदेवळा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या सभेला जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन, सदस्य मधुकर काटे, अमित देशमुख आदींनी सहभाग नोंदविला होता.
मूळ पदभार देण्याची मागणी
शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्याकडे मूळ पदभार हा एरंडो गटविकास अधिकारी म्हणून असून त्यांना हा मूळ पदभारच पूर्णवेळ द्यावा, अशी मागणी सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे शिक्षण विभागाचा पदभार हा काही कालावधीपुरताच देता येतो. एरंडोलच्या ग्रामपंचायतींची अनेक कामे प्रलंबित असल्याने तक्रारी वाढल्या असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सभेत सांगितले.