जि. प. सीईओंना पुन्हा कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:17+5:302021-03-16T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना साधारण वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना साधारण वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांचा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल बाधित आढळून आला. त्यांच्या मुलालाही संसर्ग झाला असून ते होम क्वारंटाईन असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या चार दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिला दिनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असल्याने हाय रिस्क म्हणून अन्य काही लोकांनी तपासणी करून घेतली होती. त्यात जि. प. सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांचा अहवाल रविवारी आला. यासह त्यांच्या मुलाला ताप असल्याने त्यांचीही टेस्ट करण्यात आली. तेही यात बाधित आढळून आले आहेत.
आणखी एक कर्मचारी बाधित
सीईओ पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने हाय रिस्क कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कॅम्प घेतला. यात ॲन्टीजन चाचणीत आरोग्य विभागाचा एक कर्मचारी बाधित आढळून आला आहे. जिल्हा परिषदेत संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे गंभीर चित्र आहे.
ऑनलाईन बैठकीत सहभाग
सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी बाधित असताना जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदविला होता.