जि. प. अध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:03+5:302021-03-13T04:30:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग वाढला असून अध्यक्षा रंजना पाटील यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग वाढला असून अध्यक्षा रंजना पाटील यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरूवारी त्यांना हा अहवाल प्राप्त झाला. त्या सध्या त्यांच्या घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. दरम्यान, जि. प.च्या बांधकाम विभागात दोन कर्मचारी बाधित आढळल्याने हा विभाग बंद करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेतील विविध विभागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागात पुन्हा दोन वरिष्ठ सहायक बाधित आढळून आले आहेत. मात्र, या विभागात कुठल्याच उपाययोजना नसल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्हाला सॅनिटायझरही वैयक्तीक आणावे लागत असून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशी ओरड खुद्द कर्मचारी करीत होते. अनेकांना रक्तदाब आणि मधुमेहाची लागण असल्याने अशा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे काही कर्मचारी सांगत होते.
उपस्थिती निम्म्यावर
जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने शुक्रवारी अगदी बोटावर मोजण्या इतके अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितीबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना नाहीत. मात्र, बाधितांचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या संपर्कातील कर्मचारी निघून गेल्याचे सांगण्यात येत होते.
सभा आता ऑनलाईन
जिल्हा परिषदेची १५ रोजी होणारी स्थायी समितीची तहकूब सभा ही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांनी दिली. विशेष अर्थसंकल्पीय सभाही २२ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, ती कशी होईल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.