जि. प., पं. स निवडणुकांच्या प्रशासकीय हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:30+5:302021-06-16T04:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषद व १५ पंचायत समिती यांची अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ ला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषद व १५ पंचायत समिती यांची अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ ला मुदत संपत असून या निवडणुकांसाठी आता गट व गणांची माहिती संकलित करावी, असे निर्देश स्थानिक प्रशासनाने तहसीलदारांना दिले आहे. तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येची माहिती प्रमाणित प्रपत्रामध्ये पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहे. त्यानुसार आता प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून गट, गणांची रचना कशी राहणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
निवडणुका घेण्यासाठी सदस्यसंख्या निश्चित करण्यासाठी लोकसंख्येची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्याचे पत्र उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी तहसीलदारांना ४ जून रोजी दिले आहेत. जिल्हा परिषदेत ६७ गट तर पंचायत समित्यांचे १३४ गण आहेत. यात विशेषत: नशिराबाद येथे नगरपरिषद झाल्यास या गटातील नेमकी परिस्थिती काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यात अनेक राजकीय गणिते बदलणार असून आगामी काळात कुठून लढायचे याबाबत मातब्बरांकडून आढावाही घेतला जात आहे.