जिल्हा परिषद भरणार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी
By अमित महाबळ | Published: November 30, 2023 06:22 PM2023-11-30T18:22:35+5:302023-11-30T18:22:56+5:30
पाचवी व आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच घेण्यात आले.
जळगाव : शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरली जाणार आहे. त्यासाठी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाचवी व आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच घेण्यात आले. जळगाव तालुक्यातील प्रशिक्षण वर्गास मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी भेट दिली. जिल्ह्यातील शिक्षकांनी आनंद कुमार यांच्याप्रमाणे मेहनत घेऊन सुपर-३० प्रमाणे विद्यार्थ्यांना यशाचे शिखर प्राप्त करून दिले पाहिजे. जेई, नीट, आयआयटी, ऑलम्पियाड यासारख्या परीक्षांमधून यश मिळवण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा पाया आहे. तो पक्का करण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन अंकित यांनी केले. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून नियमित मार्गदर्शन करण्याचे आवाहन विकास पाटील यांनी केले. आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी खलील शेख, शिक्षणविस्तार अधिकारी चिंचोले, विजय पवार, सरला पाटील व सर्व सहकारी यांचे कौतुक केले.
पुढच्या महिन्यात परीक्षा
फेब्रुवारी महिन्यात पाचवीसाठी पूर्व माध्यमिक आणि आठवीसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक परीक्षांच्या अभ्यासाचा पाया पक्का होतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी, असा प्रशासनाचा आग्रह आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क सेस निधीतून भरले जाणार आहे. जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी दिली.