जि. प.चा नाविन्यपूर्णचा २ कोटी निधी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:44+5:302021-08-12T04:21:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेला नावीन्यपूर्ण योजनेतून दिलेल्या निधीतील २ कोटी ३८ लाख ५५ हजारांचा निधी अखर्चित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेला नावीन्यपूर्ण योजनेतून दिलेल्या निधीतील २ कोटी ३८ लाख ५५ हजारांचा निधी अखर्चित राहिल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या निधीतील कामांना पुन्हा निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले असून तसे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पत्र दिले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी मंगळवारी याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतील निधी अखर्चित राहिल्यामुळे याचे दायित्व २०२१-२२ च्या निधीतून प्रदान करावे लागेल. त्यामुळे २०२१ -२२ च्या नवीन कामांचा वाव कमी होणार आहे. निधी अखर्चित ठेवणे संयुक्तिक नाही. आता ज्या कामांचा निधी अखर्चित राहिला असेल त्या कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, तसेच पुन्हा या कामांना निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.