खाजगी रुग्णवाहिकांसाठी अंतरानुसार भाडेदर लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:44+5:302021-04-10T04:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांची अडवणूक होऊ नये, याकरिता खाजगी रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांची अडवणूक होऊ नये, याकरिता खाजगी रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित करण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक दर घेऊ नयेत, असा आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. हे संपूर्ण भाडेदर अंतरानुसार लागू राहणार आहे. या भाड्यापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल; परंतु निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणी करता येणार नाही.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भाडेदर निश्चित केला आहे.
यामध्ये छोट्या (अवातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहेत.
जीप प्रकारातील (अवातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केला आहे.
मोठ्या प्रकारच्या (अवातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केला आहे.
आयसीयू (कार्डिओ व्हॅन) (वातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केला आहे.
पगार व इंधनाचा खर्चही समाविष्ट
या भाडे दरपत्रकात चालकाचा पगार व इंधनाचा खर्च समाविष्ट राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. वाहन तांत्रिकदृष्ट्या सक्षम व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चालकाची व मालकाची राहणार आहे. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरिता वाहनचालक व मालक जबाबदार राहतील, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.