ममुराबादच्या जिल्हा परिषद शाळेला अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:24+5:302021-02-20T04:45:24+5:30
ममुराबाद : संरक्षण भिंतीसह स्वच्छतागृह, शाळा खोल्यांची दैनावस्था लक्षात घेता गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला अक्षरशः अवकळा आली ...
ममुराबाद : संरक्षण भिंतीसह स्वच्छतागृह, शाळा खोल्यांची दैनावस्था लक्षात घेता गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला अक्षरशः अवकळा आली आहे. विद्येच्या मंदिराची ही अवस्था पाहून ग्रामस्थ व पालक वर्गातून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.
वॉर्ड तीनमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत मुलांचे व मुलींचे वर्ग भरतात. ब्रिटिशकाळापासून सुरू असलेल्या या शाळेने आजतागायत गावात अनेक विद्यार्थी घडविले आहेत. पूर्वी कौलारू वर्ग खोल्यांमध्ये भरणाऱ्या या शाळेने पक्क्या खोल्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर कात टाकली असून मराठी भाषेसोबत सेमी इंग्रजीमध्ये शिक्षणाची सोय याठिकाणी उपलब्ध झाली आहे. मात्र, देखभालीसह दुरुस्तीकडे वेळीच लक्ष देण्यात न आल्याने शाळेच्या बहुतांश वर्गखोल्यांची आता दैनावस्था झाली आहे. ब्रिटिशकालीन खोल्यांनी तर कधीच दम तोडला आहे. काही वर्ग खोल्यांचे छत जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून दुरुस्त करण्यात आले आहे. परंतु, दरवाजे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानातून बांधलेल्या काही वर्गखोल्यांचा वापर तर जुने भंगार साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. स्वयंपाकगृहांचीही मोडतोड झाली असताना तशाच अवस्थेत तिथे शालेय पोषण आहार शिजविला जातो. शाळेच्या आवारातील एकमेव ट्यूबवेल काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागते. मुलींसाठी स्वच्छतागृह अस्तित्वात नसल्याने मुलांचे स्वच्छतागृह मुलींसाठी वापरले जाते. अर्थात, मुलांना त्यामुळे बाहेर उघड्यावर लघुशंकेसाठी जावे लागते. शिक्षकांनाही मोठी कुचंबणा सहन करावी लागते. सन २००५ मध्ये वित्त आयोगाच्या निधीतून शाळेची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. काही वर्षातच त्या भिंतीची वाईट स्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे तडे पडल्याने ती केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीसुद्धा शाळा प्रशासनाकडून फार प्रयत्न होत नसल्याने विद्येच्या या प्रांगणाला मगरळ आल्याचे निदर्शनास आले आहे.
-----------------
(कोट)...
ममुराबाद येथील जि.प. प्राथमिक शाळेतील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या पाडून त्याजागी नवीन खोल्या बांधून देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. ग्रामपंचायतीचा ठराव मिळाल्यानंतर त्या कामाला चालना मिळू शकेल. स्वच्छतागृहांच्या बाबतीतही तसाच प्रस्ताव पाठविला आहे.
- अविनाश मोरे, प्रभारी मुख्याध्यापक, जि.प. शाळा, ममुराबाद
-------------------
फोटो-
ममुराबाद येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहाची दैनावस्था. (जितेंद्र पाटील)