जिल्ह्यात एकूण ५०७ कोटी पीककर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:02 PM2018-06-11T23:02:00+5:302018-06-11T23:09:41+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जळगाव: खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरीही लावली आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाही खरीप पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याच्या तक्रारी असल्याने जिल्हाधिकाºयांनी सोमवार, ११ रोजी पीककर्जाबाबत सर्व बँकांच्या अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हाबँकेसह सर्व २७ बँकांनी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५०७ कोटींचे पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असून शेतकºयांना बियाणे व खते घेण्यासाठी पैशांची तातडीने गरज आहे. मात्र राष्टÑीयकृत बँकांकडून पीककर्ज वाटपास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही पीककर्ज दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तर शेतकºयांची बँक म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा बँकेने कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना ५० टक्केच कर्ज देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र जे थकबाकीदार नाहीत, त्या शेतकºयांनाही कर्ज मिळत नसल्याची, दिरंगाई होत असल्याची तक्रार होती. त्यामुळे जिल्हाधिकाºयांकडून दर सोमवारी आढावा बैठक घेतली जात आहे. सोमवारी झालेल्या बैठकीस लीड बँक, जिल्हा बँक व सर्व राष्टÑीयकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते. कर्जवाटपात दिरंगाई होत असल्याने कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.
उद्दीष्टाच्या १७ टक्के पीककर्ज वाटप
सोमवार, ११ रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यात सर्व २७ बँकांकडून आतापर्यंत वाटप झालेल्या पीककर्जाची माहिती जिल्हाधिकाºयांनी घेतली. जिल्ह्यात ५० हजार ५५२ खातेदार असून त्यांना २९४४ कोटींचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेसह या सर्व २७ बँकांनी मिळून आतापर्यंत ५०७ कोटी म्हणजे उद्दीष्टाच्या जेमतेम १७ टक्केच कर्जवाटप केले आहे. जिल्हा बँकेने उद्दीष्टाच्या ३२ टक्के तर उर्वरीत सर्व बँकांनी १८ टक्केच कर्जाचे वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.