निर्बंधांच्या काळात ९५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:17 AM2021-05-06T04:17:34+5:302021-05-06T04:17:34+5:30
जळगाव : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात गरीब गरजूंसाठी मोफत शिवभोजन ...
जळगाव : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात गरीब गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यात जिल्ह्यात आतापर्यंत ९४ हजार ८५७ मोफत थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. शहरी भागात १६ केंद्रांमधून १ हजार २५० थाळ्या आणि ग्रामिण भागात २ हजार १७५ थाळ्या वितरित करण्यात येतात.
शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पूर्ण नाव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहेत.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासून विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दीडपटीने वाढवून दिला असून त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांना इष्टांक दीडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज ५,१२५ थाळ्यांचे वितरण सुरू आहे.
निर्बंध कालावधीत जिल्ह्यात या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ ९४ हजार ८५७ लाभार्थ्यांनी घेतला आहे.