भुसावळात अंतर्नादतर्फे गरजूंना फराळ, कपडे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 02:21 PM2020-11-20T14:21:15+5:302020-11-20T14:23:52+5:30
मोलमजुरी करून पोटाची खडगी भरणाऱ्यांना अंतर्नाद प्रतिष्ठानने १२ कुटुंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेसचे वाटप केले.
भुसावळ : मोलमजुरी करून पोटाची खडगी भरणाऱ्यांना अंतर्नाद प्रतिष्ठानने दिवाळीच्यानिमित्ताने १२ कुटुंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेसचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. हे सर्व कुटुंब नहाटा कॉलेज परिसरात वास्तव्याला आहेत.
ह्यवाटीभर फराळ अन् नवीन कपडे देवून वंचितांची दिवाळी गोड करू याह्ण या उक्तीला अनुसरून अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. उपक्रमांतर्गत जी मदत गोळा झाली ती गरजूंपर्यंत तीन-चार दिवसात पोहचवण्यात आली. दिवाळीच्या आदल्या दिवशी अंतर्नादतर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी वस्तीवरसुद्धा ४५० जणांना नवीन कपडे, फराळ, शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते. यानंतर नहाटा कॉलेजसमोरील परिसरात अनेक दिवसांपासून मोलमजुरी करणारे कुटुंब राहतात. सण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा असतो.
अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांना या परिवारासंदर्भात माहिती झाल्यानंतर अंतर्नादच्या सदस्यांनी या कुटुंबांची आर्थिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर बुधवारी त्यांची भेट घेऊन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. संस्था सदस्य रोहिदास सोनवणे यांची मुलगी डॉ.तेजश्री सोनवणे यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच लहान मुलांना नवीन ड्रेसचे वाटप केले.
याप्रसंगी अमितकुमार पाटील, रोहिदास सोनवणे, समाधान जाधव, तेजेंद्र महाजन, जीवन सपकाळे, दीपक फालक, अमित चौधरी, सचिन पाटील, डॉ.तेजश्री सोनवणे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.