भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे १३ रोजी साहित्य कला पुरस्कार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:12 PM2022-12-11T17:12:28+5:302022-12-11T17:14:27+5:30
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांना तर ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई),
जळगाव :
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांना तर ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई), ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई) तर ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना दि.१३ रोजी कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे सन्मानपूर्ण वितरीत होणार आहे. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना.धों.महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.
साहित्य-कला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा.डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ.शोभा नाईक, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना.धों.महानोर, ज्योती जैन यांच्या उपस्थितीत, साहित्यिक मान्यवरांच्या शिफारसींचा विचार करून चारही पुरस्कारांची निवड झाली होती.
प्रभाकर कोलते हे मुंबई येथील जे. जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.
संध्या नरे-पवार या मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखर भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
प्रवीण दशरथ बांदेकर यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले आहे. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं...’, ‘चिनभिन’ हे कविता संग्रह, ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’ या कादंबऱ्या, ‘घुंगुरकाठी’, ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ हे ललित लेख संग्रहाचे पुस्तके प्रकाशित झाली आहे.
वर्जेश सोलंकी यांच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’ व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) हे साहित्य प्रकाशित
आहे.