पक्ष्यांना पाण्यासाठी स्वखर्चाने शिक्षकाकडून भांडी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 06:16 PM2019-04-29T18:16:59+5:302019-04-29T18:17:33+5:30
स्तुत्य : सन २००६ पासून सातत्याने सुरु आहे उपक्रम, पाण्याची तरुणांवर सोपविली जाते जबाबदारी
जामनेर : तहानलेल्या माणसांना पाणी पाजण्याचे पुण्यकर्म पाणपोईच्या माध्यमातुन अनेक समाजसेवक करतात. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानात पाखरांना पाणी पाजण्यासाठी बेटावद, ता.जामनेर येथील सुनील पाटील हे शिक्षक धडपडत आहे. सुमारे २२ गावात त्यांनी पक्ष्यांना पाणी पाजण्यासाठी मातीची भांडी (परळ) त्यांनी वाटप करुन जनप्रबोधनाचे कामही केले.
केवळ भांडी वाटून ते थांबले नाही तर त्या गावातील सेवाभावी वृत्तीच्या तरुणांना वेळोवेळी भांड्यात पाणी टाकण्याची जबाबदारीही ते सोपवतातम. या उपक्रमात त्यांना गावागावातील शिवराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे.
सुनील पाटील हे चिंचखेडे येथील माजी सरपंच आहे. २००६ पासुन ते हा उपक्रम निस्वार्थ भावनेतुन राबवीत आहे. मातीची भांडी ज्याला ग्रामीण भागात बाडगे म्हणतात, ते संबंधीत गावातील कुंभाराकडुनच बनवून घेतात. गावातील तरुणांना भांडी वाटप करुन झाडावर बांधुन त्यांना वेळोवेळी त्यात पाणी टाकण्याची जबाबदारी सोपविली जाते.
... अशी केली भांडी वाटप
मोयखेडे दिगर २५, नांद्राहवेली ५०, रांजणी २५, देवळसगाव २०, वाडिकील्ला २५, वाघारी २५, बेटावद बुद्रुक ५० व बेटावद खुर्द ५०, टाकळी २० या प्रमाणे नुकतेच त्यांनी भांडी वाटप केली. स्व. भैयुजी महाराज यांच्या प्रेरणेतुन, राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, शिवराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे करणे शक्य झाल्याचे ते सांगतात. मुक्या पाखरांना पाणी पाजल्याने ज्या आत्मीक सुखाची अनुभुती मिळते असेही त्यांचे म्हणणे आहे.