फ्रान्सच्या पर्यटकाच्या जळगावातील ‘संचारा’ने तारांबळ, पोलीस, जिल्हा प्रशासनाने दिला आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 04:21 PM2020-03-22T16:21:39+5:302020-03-22T16:22:15+5:30
कोरोनाचे लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटका
जळगाव : भारत भ्रमंतीसाठी आलेल्या फ्रान्सच्या ज्युलियन पेरी (३५) या पर्यटकाने रविवारी शहरातील पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. कोरोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचा फटका या पर्यटकाला बसला. वाहतूक बंद असल्याने तो शहरातील रस्त्यांवर फिरत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे तो ठणठणीत असल्याचे निदान झाल्याने त्याची सुटका झाली खरी पण कुणीही हॉटेलमध्ये जागा देत नव्हते. शेवटी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा करून पोलिसांनीच त्याची जेवणाची व्यवस्था केली व विश्रामगृहात आसरा दिला.
अजिंठा, वेरुळ जाण्याचे नियोजन
ज्युलियन हा तरुण पर्यटक डिसेंबर २०१९ पासून भारतात आला आहे. त्यावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव नव्हता. रविवारी तो अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी रेल्वेने जळगावात आला. मात्र, जनता कफ्यूर्मुळे सर्वत्र बंद असल्याने त्याला हॉटेल मिळत नव्हते. शिवाय वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तो शहरातील रस्त्यांवर फिरत होता. ही बाब जळगाव पोलीस दलातील शीघ्र कृती दलाचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्याची विचारपूस करून त्याला कोर्ट चौकात थांबवले. खबरदारी म्हणून नियंत्रण कक्षाला ही माहिती कळवली. त्यानंतर १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून या परदेशी पर्यटकाला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले.
जिल्हा प्रशासन, पोलिसांनी केली व्यवस्था
दरम्यान, ज्युलियन याला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर तो जिल्हा क्रीडा संकुल चौकात आला. तेथे पोलिसांनी त्याची चौकशी केली व या विषयी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या पर्यटकाची निवासाची व्यवस्था केली. सोमवारी ज्युलियन पुढच्या प्रवासाला रवाना होणार आहे. या सर्व प्रकारामुळे तो गोंधळात पडला होता. तर पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती.
निकषात नसल्याने रूग्णालयातून सोडले
फ्रान्सचा तरूण ज्युलियन हा क्वारंटाईन करण्यासाठी असलेल्या निकषात बसत नसल्याने त्याला शासकीय रूग्णालयातून सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सोडून देण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.