कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘जिल्हा बंदी’ आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 08:06 PM2020-03-23T20:06:32+5:302020-03-23T20:06:53+5:30
जळगाव : जगासह देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘जिल्हा बंदी’चे आदेश जारी ...
जळगाव : जगासह देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘जिल्हा बंदी’चे आदेश जारी करण्यात आले आहे़ त्यात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे़
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यानुसार पोलीस अधिक्षक जळगाव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना संयुक्तरित्या जिल्हातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत़ अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा बाहेरी जिल्ह्यतील नागरिकास जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे़
आदेशातून यांना वगळले...
‘जिल्हा बंदी’ आदेशातून शासकीय, निमशासकीय, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन वाहने, अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ, पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था अर्थात पिण्याचे पाणी, दुध, फळे, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे, टेलीफोन व इंटरनेटची सेवा, हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारे साधन सामुग्री, प्रसार माध्यमांची वाहने, विद्युत विभागाशी संबंधित उपकरणे, पेट्रोल, गॅस, डिसेल आदींना या बंदी आदेशातून वगळण्यात आलेले आहे.