रब्बी पीक कर्ज वाटपात जिल्हा बँक पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:07+5:302021-02-20T04:46:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपात यंदा बँकांनी चांगलाच हात आखडता घेतला आहे. त्यात जिल्हा बँकेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपात यंदा बँकांनी चांगलाच हात आखडता घेतला आहे. त्यात जिल्हा बँकेने आपल्या उद्दिष्टाच्या फक्त १.६० टक्केच कर्जवाटप केले आहे. यंदा बँकेने ८५४ सभासदांना फक्त २ कोटी ७० लाख रुपये कर्ज दिले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही पीक कर्जासाठी हात आखडताच घेतला आहे.
जिल्हा बँकेला रब्बीसाठी १६९ कोटी १२ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बँकेने फक्त २ कोटी ७० लाखांचेच कर्ज दिले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांना ४४३ कोटींचे लक्ष्य होते. मात्र कुणाचाही धाक नसलेल्या या बँकांनी कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांची फिरवाफिरव केली आणि फक्त ८३ कोटी ३३ लाखांच्या कर्जाचे वाटप केले. त्यात जिल्हाभरातून कर्जदार फक्त १००६ आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्ष्याच्या फक्त १८.७७ टक्केच कर्ज दिले आहे.
याबाबतीत ग्रामीण बँका मात्र पुढे आहेत. त्यांनी ६५ टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण केले. यामुळे बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना हातउसने पैसे घेऊन रब्बी पिकांचा खर्च करावा लागला आहे. मुळात रब्बी पिकांसाठी बहुतेक शेतकरी खरीप हंगामात आलेला पैसाच वापरतात. त्यामुळे रब्बी हंगामासाठी उद्दिष्ट हे खरीप हंगामापेक्षा कमी असते. असे असले तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कायमच पैशांची चणचण भासते. त्यातच यंदा कोरोनाने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना वेळेवर अर्थपुरवठा करण्याची गरज होती. मात्र बँकांनी तेथेही हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणवली जाणारी जिल्हा सहकारी बँकनेदेखील सावध पवित्रा घेतला आहे.
आकडेवारी
रब्बी पीक कर्जाची स्थिती
बँकेचे नाव- वाटप केलेले कर्ज- टक्केवारी
जिल्हा बँक- २ कोटी ७० लाख- टक्केवारी १.६० टक्के
राष्ट्रीयीकृत बँका- ८३ कोटी ३३ लाख- टक्केवारी १८.७७ टक्के
ग्रामीण बँका- २ कोटी ७७ लाख- टक्केवारी----