जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यात रस नाही : मंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:00+5:302021-09-21T04:18:00+5:30
राजकारणात वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक आम्ही मित्र असतो. जनता जनार्दनच्या आशीर्वादाच्या दिशेने आम्हाला जावे लागते, असे सांगून गुलाबरावांनी ...
राजकारणात वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक आम्ही मित्र असतो. जनता जनार्दनच्या आशीर्वादाच्या दिशेने आम्हाला जावे लागते, असे सांगून गुलाबरावांनी औरंगाबाद आणि शहादा येथील बहुचर्चित राजकीय बातम्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
---
दोघे भाऊंचे पाणी कुठे गेले?
योगायोगाने जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊंना मिळत आहेत. नाथाभाऊ, गिरीशभाऊ आणि आता गुलाबभाऊ आणि तिघांकडे पाण्याचे खाते मिळाले, ते दोघे भाऊ शेतीला पाणी देत होते, मी पिण्याचे पाणी देतो. ते चारीने देत होते मी पाईपाने देतो. चारीचे पाणी वाया जाते, पाईपचे पाणी वाया जात नाही, माझे पाणी थेट पोहोचले, त्यांचे पाणी कुठे गेले मला माहीत नाही, असे सांगून त्यांनी मार्मिक टोलाही लगावला.
प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी राहू द्या !
अमळनेरच्या राजकीय युतीबाबत त्यांनी अनिल पाटील व साहेबराव पाटील यांच्या कामांच्या धडपडीचे कौतुक करून त्यांना उद्देशून सांगितले की, तुमची युती चांगली चाललीय. त्यामुळे ‘दोन्ही दादा, प्यारका वादा फिफ्टी फिफ्टी’ राहू द्या, आमची सेनेची ताकद कमी आहे, आम्हाला मान्य आहे; मात्र आम्हालाही आगामी निवडणुकीत शहरात ग्रामीण भागात कुठेतरी संधी द्या, असेही सूचक आवाहन त्यांनी केले.
कार्यकर्ते सूर्यफुलासारखे !
राजकारणात समर्थक कार्यकर्ते कसे असतात, यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, २० टक्के कार्यकर्ते सूर्यफुलासारखे असतात. जिकडे सूर्य तिकडे ते वळत असते, अशा कार्यकर्त्यांचे रक्त तपासले पाहिजे.
जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली तेव्हापासून सर्वाधिक निधी खर्च करणारा मी एकमेव पालक मंत्री आहे. इतर पालकमंत्र्यांनी पालिका, महापालिकेस निधी देण्यास टाळाटाळ केली, मी जळगाव महापालिकेस ६१ कोटी दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.