जिल्हा बँक नोकर भरती प्रक्रिया महिनाभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:21 AM2017-09-23T00:21:18+5:302017-09-23T00:22:11+5:30
वार्षिक सर्वसाधारण सभा : एकनाथराव खडसे यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा बँकेतील नोकर भरतीला शासनाकडून मंजुरी मिळाली असून ही प्रक्रिया महिनाभरात राबविली जाईल, अशी घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
जिल्हा बँकेच्या आवारात शुक्रवारी बँकेची १०१ वी सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, सरकारची परवानगी नसल्यामुळे आतापर्यंत कर्मचारी भरती करता आली नाही, परंतु नुकतीच परवानगी मिळाली असून आॅनलाईन भरती होणार आहे. राज्यातील कोणीही व्यक्ती अर्ज करु शकतो. मात्र केवळ जिल्ह्यातील तरुणांनाच संधी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती परंतु ती सरकारने ती मान्य केली नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला़
२ वर्षात बॅँक पूर्णत: एनपीए तून बाहेर येईल
यावेळी खडसे म्हणाले की कोणतेही काम करताना त्रुटी असू शकते परंतु ती दूर करण्याची भूमिका असली पाहिजे. तीन वर्षांपूर्वी बँकेला ‘ड’ वर्ग मिळाला होता, आता प्रथमच बँक ‘अ’ वर्गात आली आहे. सर्व संचालक कोणताही भत्ता न घेता बँकेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे. पूर्वी ठेवी कमी होत होत्या. आता तीन वर्षात ८५० कोटींच्या ठेवींची नव्याने वाढ झाली आहे. हा बँकेने विश्वास कमवला आहे. नोटा बंदीच्या काळात बँकेचे व्यवहार ठप्प होऊन बँकेस थोडा तोटा सहन करावा लागला. असे असतानाही बँकेचा ढोबळ नफा २३ कोटी इतका आहे.
बँकेची स्थिती सुधारत असून २ वर्षात बॅँक पूर्णत: एनपीए तून बाहेर येईल, असेही त्यांनी आश्वासित केले. तर दूध संघानेही २५ कोटी रुपये नफा कमवला असून राज्यात प्रथम क्रमांकवर संघ आहे. मी कधीही चुकीचे काम करणार नाही, असेही त्यांंनी सांगितले.
दिवाळीचा बोनस २० दिवसांचा
बँकेच्या कर्मचाºयांना दरवेळेस १५ दिवसांचा दिवाळी बोनस देण्यात येतो. यंदा मात्र हा बोनस २० दिवसांचा देण्यात येईल, अशी घोषणा एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणातून केली. या घोषणेचे कर्मचाºयांनी स्वागत केले.