जिल्हा बँक भरतीसाठी १५ ते १७ लाखांचा रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:15 PM2020-01-25T12:15:08+5:302020-01-25T12:15:25+5:30

पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध: मात्र गुणांचा उल्लेखच नाही; स्थानिक कमिटी घेणार १० गुणांसाठीच्या मुलाखती

 District Bank Recruitment Rate of Rs | जिल्हा बँक भरतीसाठी १५ ते १७ लाखांचा रेट

जिल्हा बँक भरतीसाठी १५ ते १७ लाखांचा रेट

Next

जळगाव : जिल्हा बँकेच्या लिपिक पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षेची यादी जाहीर झाली असली तरी त्यात उत्तीर्ण उमेदवारांचे गुणच देण्यात आलेले नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या भरतीसाठी १५ ते १७ लाखांचा रेट फुटला असल्याची चर्चा सुरू असून कागदपत्र पडताळणी व मुलाखतीच्या १० गुणांमध्येच गडबड होण्याची भिती व्यक्त होत आहे.
जिल्हा बँकेत रिक्त असलेल्या विविध ४९० पदांपैकी कारकुनांची २२० पदे सरळ सेवेने व आॅनलाईन पद्धतीने भरण्यास सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी परवानगी दिली होती. त्यासाठी इन्स्टीट्यूट आॅफ बँकींग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मुंबई या एजन्सीची निवड केली. या एजन्सीने १ आॅगस्ट २०१९ रोजी या पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करून २२ सप्टेंबर २०१९ रोजी आॅनलाईन परीक्षा घेतली. त्यात पात्र ठरलेल्या ६९५ उमेदवारांची यादी आता एजन्सीने प्रसिद्ध केली आहे.
गुणवत्ता यादीत गुणच नाहीत
जिल्हा बँकेच्या नोटीस बोर्डवर तसेच वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या आॅनलाईन परिक्षेत उत्तीर्ण ६९५ उमेदवारांच्या गुणवत्ता यादीत संबंधीत उमेदवारांचे गुण देणे अपेक्षित होते. जेणेकरून मुलाखतीतील १० गुण मिळून कोणाचा क्रमांक लागणार हे स्पष्ट झाले असते. मात्र उमेदवारांच्या नावांसमोर गुणच दिलेले नाहीत.

मुलाखतीत गडबड होण्याचा संशय
मुलाखतीचे १० गुण असून लेखी परिक्षा व मुलाखतीचे गुण मिळून अंतीम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे या मुलाखतीच्या १० गुणांवरच सगळा खेळ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या जागांसाठी सुमारे १५ ते १७ लाखांचा रेट सुरू असल्याचीही चर्चा सुरू आहे.

स्थानिक कमिटीच घेणार मुलाखती
आयबीपीएसकडून आॅनलाईन भरती परीक्षा पार पडली असली तरीही १० गुण असलेल्या मुलाखती मात्र स्थानिक कमिटीमार्फतच होणार आहेत. त्यात बँकेचे संचालक व जिल्हा उपनिबंधक आदी ५-६ जणांचा समावेश राहील. मात्र अद्याप ही कमिटी निश्चित झालेली नाही. तसेच मुलाखतींचा कार्यक्रमही निश्चित झालेला नसल्याचे समजते.

आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. मात्र त्यावर गुण दिलेले नाहीत, याबाबत मला माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल. मात्र ही पूर्ण प्रक्रिया आयबीपीएसकडून होत आहे. त्यामुळे १०० टक्के पारदर्शक प्रक्रिया आहे. कोणावरही अन्याय होणार नाही.
-आमदार किशोर पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा बँक, जळगाव.

Web Title:  District Bank Recruitment Rate of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.