इंटरनेटअभावी शिरसोली येथे जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:10+5:302021-06-05T04:13:10+5:30
शिरसोली : जिल्हा बँकेच्या शिरसोली शाखेमध्ये गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना ...
शिरसोली : जिल्हा बँकेच्या शिरसोली शाखेमध्ये गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना वारंवार चकरा माराव्या लागत असून, शेतकऱ्यांसह ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिरसोली प्र.बो. येथे असलेल्या या बँकेत बहुतांश शेतकरी, सरकारी नोकर, ग्रामपंचायत व सामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत; परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून बँकेचे नेट बंद असल्याने व्यवहार ठप्प आहेत. काही ग्राहकांना तत्काळ पैशांची गरज भासल्यास बँकेतील कर्मचारी जळगाव येथील मुख्य शाखेत संपर्क साधून ग्राहकाच्या खात्याची चौकशी करून व्यवहार पूर्ण करीत आहे. यात बराच वेळ वाया जात असल्याने ग्राहक कंटाळून घरी निघून जातात.
पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना जमीन मशागत, बी-बियाणे व इतर कामांसाठी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत पीक कर्ज मिळत असते. हे सर्व व्यवहार जिल्हा बँकेशीच निगडित असल्याने शेतकरी वर्गाचे चांगलेच हाल होत आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील नेटची समस्या त्वरित मार्गी लावून व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणी होत आहे.