जिल्हा बँक संचालक अनिल पाटील व जि.प. सदस्या जयश्री पाटलांंविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 08:57 PM2019-06-20T20:57:47+5:302019-06-20T20:58:58+5:30
तहसीलदारांची तक्रार, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप
अमळनेर- येथील तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्या यांच्यातील १९ जून रोजी झालेल्या वादाचे पडसाद गुन्हे दाखल व तक्रारीत झाले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील व त्यांचे पती जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ रोजी त्यांच्या कार्यालयात पंतप्रधान किसान सन्मान योजना विस्तारित स्वरूपात लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेत असताना जि.प. सदस्या जयश्री पाटील यांनी जोराने दार लोटून आक्रमकपणे बैठकीमध्ये प्रवेश केला. काही वेळापूर्वी जयश्री पाटील यांनी देवरे यांना फोन केला होता, पण बैठकीत असल्याने देवरे फोन घेऊ शकल्या नाहीत. या रागातून त्यांनी अपशब्दांचा वापर करून सर्वांसमक्ष तहसीलदार पदाचा अपमान केला. तसेच महत्त्वपूर्ण शासकीय बैठकीमध्ये अडथळा निर्माण केला. जयश्री यांचे पती अनिल भाईदास पाटील यांनी फोन करून १०० महिला बोलावून तुमच्या तोंडाला काळे फसणार, अशी धमकी देवरे यांना दिली होती. सदर फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ५०१, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सदगीर करीत आहेत.
दरम्यान, तहसिलदारांनी शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या जयश्री पाटील यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी प्रांत अधिकारी सीमा अहिरे व जळगाव जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. दुष्काळ निवारणाच्या निधीचे दस्तऐवज तहसीलदार यांच्या टचेबलवर अनेक दिवसांपासून असल्यामुळे त्यचासंबंधी विचारणा करण्यासाठी जयश्री पाटील गेल्या होत्या. त्यांचा फोनही देवरे यांंनी उचलला नाही. शेतक-यांच्या दुष्काळ निधीबाबत विचारले असता, देवरे यांनी तू विनापरवानगी आत कशी आलीस, असे खड्या आवाजात म्हटले. त्यानंतर त्य मला उद्धटपणे बोलत राहिल्या. एवढेच नाही, तर माझी व्हिडिओ शुटींग काढणे त्यांनी सुरु केले. मला अपमानास्पद वागणूक देऊन शासकीय कामात अढथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्याची धमकी दिली, असे जयश्री पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. दबंग अधिका-यावर १५ दिवसांच्या आत शासकीय कारवाई न केल्यास आपल्या कार्यालयाच्या आवारात आम्ही कायदेशीर मागार्ने उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत, असे पत्र प्रांताधिकारी यांना दिले आहे.
यावेळी जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, मुक्तार खाटीक, प्रवीण पाटील, अलका पवार, दीपक पाटील, गौरव पाटील, बाळू पाटील, भटू पाटील, राहुल गोत्राळ, प्रदीप पाटील, दौलत पाटील, संभाजी पाटील, देविदास देसले, सचिन पाटील, तेजस वानखेडे, दिनेश कोठावदे, नंदकिशोर पाटील, अभी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.