जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना शोध मोहिमेची मुहूर्तमेढ रोवलीय खानापूरच्या आरोग्यसेवकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:07 PM2020-06-27T15:07:52+5:302020-06-27T15:08:55+5:30
वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी खानापूर गावातील १४ कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल आठ रुग्णांचा स्क्रिनिंगमधून शोध घेतल्याची बाब त्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर पाहता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या बदलीनंतर नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘ट्रेस, टेस्ट व ट्रिट’ अशी ‘ट्रिपल-टी’च्या कोरोनारुग्ण शोधमोहीम अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. तथापि, वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी खानापूर गावातील १४ कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल आठ रुग्णांचा स्क्रिनिंगमधून शोध घेतल्याची बाब त्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली आहे.
कोरोना विषाणूचे अनलॉकमुळे होत असलेल्या वाढत्या संक्रमणात स्वत:च्या अंगावरची कातडी अर्थात जीव वाचवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांंमध्ये बहुतांशपणे नकारात्मक भावना मोठ्या प्रमाणात जाणवते. किंबहुना, जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग गुदरलाच तर काहींची समर्पणाची भावना असते. तेही फार तोकडे प्रमाणात असतात, तर काही जण पानावर पान ठेवून पाट्या टाकण्याचे काम करीत जबाबदारी पार पाडणारे असतात.
तालुक्यातील खानापूर गावात अशा दोन्ही वृत्तीची मनोभावना ग्रा पं प्रशासकीय व आरोग्य कर्मचाºयांमध्ये आढळली. खानापूर गावात रावेर शहरातील जिजाऊ नगरातील मयत विधवा कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील महिला व तिची दोन वर्षे वयाची नात कोरोना बाधित असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. तद्नंतर, उभय गावातील कुंडी परिसरातील दोन्ही आई व मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. असे सहा रुग्ण कोरोना बाधित झाले. त्याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्राची निर्मिती करणे, प्रतिबंधित क्षेत्र सुरक्षित ठेवणे व स्वयंसेवक नियुक्त करून जीवनावश्यक वस्तू पुरवणे या बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.
तर दुसरीकडे मात्र वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पदावर चार वर्षांपासून सेवारत असलेले आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी मात्र या दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रासह बफर झोनमध्ये घराघरात इन्फ्रारेड थर्मामीटर व आॅक्सी पल्समीटरद्वारे धडक स्क्रिनिंगची शोधमोहीम राबवली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील व नोडल आॅफिसर डॉ.एन.डी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक दिनेश सांडू चौधरी यांनी आशावर्कर आरती शेलोडे, अनिता बुंदेले, वंदना तायडे, रंजना धनगर अंगणवाडी सेविका कुंदा धांडे, सुनीता धांडे, आशा तायडे, काजल धांडे व ग्रा.पं.शिपाई किरण सोनवणे यांच्या पथकाच्या अथक परिश्रमातून चार प्रतिबंधित क्षेत्रात सतत तीन चार-दिवस संशयित रूग्णांच्या शरीरातील आॅक्सिजनचे सरासरी प्रमाण ९५ टक्केच्या खाली आढळलेल्या वाघ वाड्यातून एकापाठोपाठ एक पुरूष, एक युवक व तीन महिला तर सप्तशृृंगीनगरातील एक सलून व्यावसायिक अशा सहा जणांना रावेर कोविड केअर सेंटरला पाठवले. दरम्यान, माळीवाड्यातील एका आजारी रुग्णासह त्यांच्या पत्नीलाही स्क्रिनिंग करून शोधमोहिमेत पाठवले होते. त्यात या आठही जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी प्रामाणिक व समर्पित भावनेने हाती घेतलेल्या अभियानात यश प्राप्त केले आहे.
ग्रा.पं.प्रशासनाकडून त्यांना स्क्रिनिंंग झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या हातावर टाकण्यासाठी सॅनिटायजरचे द्रव वा शोधमोहिमेतील आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित मास्क दिले नसताना प्रत्येक नागरिकाला तपासणीनंतर साबण लावून हात धुण्याचा व खासगी वापरातील सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला देवून खडतर प्रयत्नांनी त्यांनी आपली ही यशस्वी मोहीम सुरूच ठेवली आहे. परवाच त्यांनी उभय गावातील शाळेच्या शिपाई असलेल्या एका पुरुषाचे आॅक्सीपल्स कमी आल्याने त्यांना संशयित रुग्ण म्हणून रावेर कोविड केअर सेंटरला दाखल केले आहे.
अर्थात नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेनुसार आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी प्रतिबंधित क्षेत्रासह बफर झोनमध्ये स्क्रिनींग व कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करतांना कोविड केअर सेंटरला पाठवलेल्या ३० जणांपैकी चार कोरोना बाधित रूग्ण हे कॉण्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये तर चार रूग्ण हे स्क्रिनिंगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हाधिकारी राऊत यांच्या ट्रिपल टी या शोधमोहिमेची आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी त्यांच्या आशावर्कर व अंगणवाडी पथकासोबत अथक परिश्रम घेत खºया अर्थाने मुहूर्तमेढ रोवली आहे.