गाळेधारकांना आंदोलन थांबविण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:05+5:302021-06-28T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात पुन्हा नव्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात पुन्हा नव्याने निर्बंध लागू केले आहेत. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच गेल्या बारा दिवसांपासून साखळी उपोषण करत असलेल्या गाळेधारकांकडून दररोज आंदोलन केले जात आहे. याठिकाणी आंदोलनामुळे गर्दी वाढत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गाळेधारकांना आंदोलन थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. परवानगी केवळ साखळी उपोषणाला दिली असल्याने उपोषण सुरु ठेवा मात्र आंदोलने न करण्याचा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
गेल्या बारा दिवसांपासून मनपा प्रशासनाविरोधात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणासोबतच गाळेधारकांकडून दररोज वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनात मात्र गाळेधारकांची संख्या देखील वाढत असल्याने, प्रादुर्भाव वाढण्याची भिती असते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गाळेधारकांना आंदोलने थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गाळेधारक संघटनेने सोमवारी होणारे जलसमाधी आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, गाळेधारकांनी जोपर्यंत मनपा प्रशासनाकडून गाळे प्रश्नावर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे.
मनपाची तयारी पुर्ण
मनपा प्रशासनानेदेखील आता गाळे कारवाई करण्याची तयारी पुर्ण केली असून, मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची यादी देखील तयार झाली आहे. नुतनीकरणासाठी आता गाळेधारकांना आपल्याकडील पात्रता मनपाकडे सिध्द करायची असून, सिध्द न झाल्यास गाळ्यांचा लिलाव होणे अटळ आहे. दरम्यान, मनपाने सुनावणीसोबतच थकीत भाडे वसुलीसाठी देखील प्रयत्न सुरु केले असून, पुढील आठवड्यात मोठा निर्णय घेतला जाण्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.