जळगाव मनपातील उड्डाण पदोन्नती देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:17 PM2019-06-26T12:17:40+5:302019-06-26T12:18:04+5:30
भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक
जळगाव : मनपात कर्मचाºयांना दिलेली बेकायदेशिर उड्डाण पदोन्नती तत्काळ रद्द करून संबंधीत ९२ कर्मचाºयांना मूळ पदावर आणण्याचे तसेच बेकायदेशिर पदोन्नती देणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी भ्रष्टाचार निमूर्लन समितीच्या बैठकीत मनपा अधिकाºयांना दिले.
माहिती अधिकार कार्यकर्ता अजय घेंगट यांनी मनपातील बेकायदेशिर उड्डाण पदोन्नतीबाबत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार केली होती. त्यात तत्कालीन नगरपालिका व विद्यमान मनपाच्या आस्थापनेवर बेकायदेशिर भरती तसेच पदोन्नतीबाबत कायदेशिर प्रक्रियेचा अवलंब न झाल्याने बेकायदेशिर उड्डाण पदोन्नती देण्यात आल्याची तक्रार केली होती. तसेच याप्रकरणी कायदेशिर कारवाई करून संबंधीत उड्डाण पदोन्नती घेतलेल्यांना पदावनत करून तत्कालीन अधिकाºयांवर व पदाधिकाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तत्कालीन पालिका व नंतर मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांना पदोन्नती देताना व भरती करतानाही राज्य निवड मंडळ, नगरविकास विभाग यांच्याकडून विभागीय आयुक्तांकडून रोस्टर बिंदू नामावली तसेच नियमानुसार प्रक्रिया पार पाडली गेली नाही. उड्डाण पदोन्नतीचा लाभ घेणाºया अनेक कर्मचाºयांना प्रथम मुळ नियुक्तीची पदस्थापना त्यांच्या परिविक्षाधिन कालावधी निश्चित केलेला नसताना केवळ २ ते ३ दिवसांतच उड्डाण पदोन्नती देऊन मनपाच्या तिजोरीवर वेतनाचा बोजा वाढविण्यात आला. यामुळे मनपाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
जोशी समितीच्या अहवालातही याबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. मनपाच्या लेखापरिक्षणातही तत्कालीन नगरपालिकेत झालेल्या बेकायदेशिर उड्डाण पदोन्नत्यांबाबत स्पष्ट आक्षेप नोंदविलेले आहेत. त्यांनी २१ जून २०१५ रोजी मनपाकडे यााबत खुलासा मागविला होता. मात्र गैरप्रकार दडपण्यासाठी मनपाच्या अभिलेखातील कागदपत्रांची सुरक्षितताही बाधीत करण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
सातबारा नसताना शेती घेतल्याची राहुल मुंडकेंबाबत तक्रार
नुकतेच बदलून गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी हे तत्कालीन तहसीलदार यावल या पदावर असताना त्यांनी स्वत: शेतकरी अथवा शेतमजूर नसतानाही पदाचा (अधिकाराचा) गैरवापर करून शेती खरेदी केल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत विजयकुमार काकडे यांनी दाखल केली. स्वत: शेतकरी अथवा शेतमजूर नसल्यास शेती खरेदी करता येत नाही. मात्र मुंडके हे २००८ मध्ये यावल येथे तहसीलदार पदावर कार्यरत असताना त्यांनी ते स्वत: शेतकरी अथवा शेतमजूर नसतानाही अधिकाराचा दुरुपयोग करीत ‘दुय्यम निबंधक श्रेणी १’ यांच्याशी हातमिळवणी करून शेती खरेदी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कारवाईची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी मुंडके यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले. मुंडके यांना नोटीस काढून शेती खरेदीसाठी परवानगी घेतली होती का? याची विचारणा केली जाईल. परवानगी घेतली नसेल तर मात्र कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.
दोन दिवसांत दिली होती ९२ कर्मचाºयांना उड्डाण पदोन्नती
मजूर, माळी, शिपाई, पंप अटेंडंट, वॉचमन, हेल्पर आदी पदांवर नियुक्ती केलेल्या तब्बल ९२ कर्मचाºयांना कर्मचाºयांना नियुक्तीच्या दोन-तीन दिवसांनंतरच अभियंता, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लिपिक आदी पदांवर उड्डाण पदोन्नती देण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
मनपातील उड्डाण पदोन्नतीचा प्रकार हा नियमांच्या विरूद्ध आहे. त्याबाबत तत्काळ कारवाईचे आदेश मनपा अधिकाºयांना दिले आहेत. तसेच आरोग्य निरीक्षकांचे प्रमाणपत्रही राज्य शासनाच्या नियमानुसार नाही. त्याबाबत मनपाने शासनाकडे मार्गदर्शन मागवूनही शासनाने काहीही कळविलेले नाही. त्यामुळे मनपाने सद्य नियमांनुसार कारवाई करणे अपेक्षित अहे. त्यामुळे या आरोग्य निरीक्षकांनाही तत्काळ पदावनत करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशांची अंमलबजावणी केली नाही तर याबाबत सरळ शासनाला अहवाल पाठविला जाईल. तसेच राहुल मुंडके यांना नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. अन्यथा त्यांना नियमानुसार कारवाईस सामोरे जावे लागेल.
-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.