५४ वकीलांची ८१ ब विरोधातील याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:43 PM2019-02-16T21:43:49+5:302019-02-16T21:44:39+5:30
गाळेधारकांना धक्का
जळगाव - महानगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती शाहु महाराज मार्केटमधील वकील चेंबरमधील ५४ वकीलांनी मनपाच्या ८१ ब विरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे वकील चेंबरमधील ६१ गाळे जप्त करण्याचा मनपाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याचे आदेश जून २०१७ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सात महिन्यांपुर्वी मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी छत्रपती शाहु महाराज मार्केटमधील ६१ गाळ्यांबाबत ५४ वकीलांना ८१ ब ची नोटीस बजावून, हे गाळे खाली करण्याचे आदेश दिले होते. ही नोटीस रद्द करण्याबाबत ५४ वकीलांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शनिवारी सायंकाळी न्यायमुर्ती गोविंद सानप यांच्या न्यायालयात अंतीम युक्तीवाद झाला. न्यायाधिशांनी याचिकाकर्ता व मनपाची बाजू ऐकून घेतली. ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमुर्ती सानप यांनी वकीलांची याचिका फेटाळली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड.केतन ढाके यांनी दिली. ५४ वकीलांची बाजू अॅड.डी.एच.परांजपे व अॅड.के.बी.वर्मा यांनी मांडली. तर मनपाची बाजू अॅड.केतन ढाके यांनी मांडली.