जिल्हा सामान्य रुग्णालयच झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:31 AM2020-06-08T10:31:51+5:302020-06-08T10:32:12+5:30

शाहू महाराज रुग्णालय मुक्त : ‘सिव्हील’चे २५० रुग्ण जाणार कोठे, ३३ रुग्णालयांच्या भरवश्याने रुग्ण वाऱ्यावर

The district general hospital itself disappeared | जिल्हा सामान्य रुग्णालयच झाले गायब

जिल्हा सामान्य रुग्णालयच झाले गायब

Next

जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना रुग्णालय होण्यापाठोपाठ जिल्हा सामान्य रुग्णालय असलेले डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयदेखील कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. त्यात शाहू महाराज रुग्णालय अधिग्रहणातून मुक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी आता सिव्हीलची सुविधा असेल. कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांच्या भरवशावर वाºयावर सोडण्यात आले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयच गायब झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सध्या जिल्हा रुग्णालय असलेल्या डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात जवळपास २५० रुग्ण दाखल असून एवढे रुग्ण जाणार कोठे असाही प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असणारे सामान्य रुग्णालयाची सुविधा डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध करून देत ते सिव्हील हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले होते. या सोबतच शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय कोविड हेल्थ केअर म्हणून अधिग्रहीत करण्यात आले होते.
इतर रुग्ण वा-यावर
रुग्णालय हलविणे व अधिग्रहण यात जिल्हा रुग्णालयच गायब झाल्याचे चित्र आहे. कोरोना व्यतिरिक्त महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत इतर रुग्णांच्या उपचारासाठी ३३ रुग्णालयांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात ३३ रुग्णालयांसह शाहू महाराज रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात असणारी यंत्रणा आहे का, असा प्रश्न निर्माण होत असून या ३३ रुग्णालयांच्या भरोशावर इतर रुग्णांना वाºयावर सोडल्याची टीका होऊ लागली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४५० खाटा तर डॉ. उल्हास पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ७५० खाटा असताना तेथे जागा कमी पडायची. आता शाहू महाराज रुग्णालयात रुग्ण गेले तरी तेथे केवळ १०० खाटा असून २५ खाटा वाढवून देण्यात येणार आहेत. तरीदेखील ते पुरेसे होतील का, असा प्रश्न निर्माण होत असून तेथे प्रसूती, दररोजचे अपघात, विषबाधा, गंभीर रुग्ण यांच्यावर उपचार शक्य होतील का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा रुग्णालय आहे तरी कोठे ?
जिल्हा रुग्णालय (सिव्हील) हे जळगाव शहरातच असावे, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती़ त्यानंतर आता रुग्णसंख्या वाढतच असल्याने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयदेखील कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहीत करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ७ रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी तसे आदेश काढले. हे रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित होणार असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय व तेथे मिळणारे उपचार कोठे उपलब्ध होतील या बाबत प्रश्न उभा राहिला आहे. शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जिल्हा रुग्णालय सुरू करण्याचे सांगण्यात येत असताना रात्री हे रुग्णालय अधिग्रहणातून मुक्त करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले. मात्र या आदेशात शाहू महाराज रुग्णालय हे सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) असा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय गेले कोठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जिल्हा रुग्णालयाची ‘ओपीडी’ मोठी
जिल्हाभरातून येणाºया वेगवेगळ््या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी असून सध्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाची ओपीडी जवळपास ५०० रुग्णांची होत असे. यात गर्भवती महिला, अपघात, विषबाधा, सर्पदंश, गंभीर रुग्णांचा समावेश आहे. येथे दररोज आठ ते १० प्रसूती होण्यासह अपघाताचे १० रुग्ण, विषबाधेचे पाच ते सहा, सर्पदंशाचे पाच ते सहा व इतरही आजाराचे रुग्ण येत असे. त्यामुळे एवढी रुग्णसंख्या कोठे हाताळता येईल असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच रुग्ण शहरात आल्यानंतर उपचारासाठी घोषित रुग्णालयांचा शोध घेणे यातच त्यांची मोठी कसरत होणार असल्याचे चित्र आहे.

रुग्णालयांमध्ये जागा नसल्यास जावे कोठे?
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या रुग्णांची संख्या वाढत पावसाळ््यामुळे इतरही आजाराच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे रुग्णालय निश्चित करून दिले आहे, ते फुल्ल असले तर इतर रुग्णांनी जावे कोठे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात आता जे रुग्णालय आहे त्यांना कार्यक्षेत्र निश्चित असल्याने एका तालुक्यातील रुग्ण दुसºया तालुक्यात अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यास त्यांना उपचार मिळतील का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

शहरात १३ नवीन रूग्ण
शहरात रविवारी १३ नवीन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे़ यामुळे रुग्णसंख्या २३४ वर पोहचली असून रविवारी ९ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ एका जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील हुडको भागात १, ख्वाजा नगर ३, संचारनगर १, वाल्मिकी नगर २, मास्टर कॉलनी २, गेंदालालमील परिसर, सालारनगर व प्रतापनगर प्रत्येक १ असे बारा तसेच अन्य एक असे १३ रुग्ण आढळून आले आहेत़ बाधित एका ४८ वर्षीय प्रौढाच मृत्यू झाला आहे़ या रुग्णाला १ जून रोजी दाखल करण्यात आले होते़ शहरातील १३७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे़ रविवारी ९ जणांना सोडण्यात आले़ आता शहरातील ७६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत़

४० नवजात शिशु कोठे हलविणार
सध्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जवळपास २५० रुग्ण दाखल आहेत. यात ४० ते ५० नवजात बालकांचा समावेश असून त्यांना कोठे नेणार असाही प्रश्न निर्माण होत आहे. नवजात शिशू कक्षात असणाºया सुविधा कशा उपलब्ध होतील, असाही सवाल उपस्थित होत आहे.

कोविड रुग्णालयात फलक
जिल्ह्यात ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत उपचार केले जाणार आहे, त्या रुग्णलयांच्या नावाचे फलक जळगाव शहरातील कोविड रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

उपचारास नकार देणाºया रुग्णालयांचा परवाना होणार रद्द
जिल्हा रुग्णालय असलेले डॉ़ उल्हास पाटील रुग्णालय कोविड घोषित करण्यात आल्यानंतर आता अन्य उपचारांसाठी शहरातील शाहू महाराज रुग्णालयासह महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट ३३ रुग्णालयात मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ या सोबतच ३३ पैकी जी रुग्णालये रुग्णांना उपचारासाठी नकार देतील त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी दिला आहे़

मंत्रिमंÞळाच्या बैठकीत जळगावच्या वाढत्या मृत्यूदरावर झाली तब्बल पंधरा मिनिटे चर्चा
जिल्ह्यातील वाढता मृत्यूदर व वाढती रुग्ण संख्या ही बाब गंभीर असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकट्या जळगावबाबत पंधरा मिनिटे चर्चा झाली, ही बाब जळगावसाठी अजिबात भूषणावह नाही, अशी खंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली़ रविवारी पत्रकार परिषदेत आगामी उपाययोजनांची माहिती देत असताना ते बोलत होते.
जळगावात ११७ जणांचे मृत्यू झाले असून यापैकी ६० वर्ष वयावरील ६२ जण होते. ज्यांना विविध व्याधी होत्या़ तर ४० ते ५९ वयोगटातील ५५ व्यक्ति होत्या़ मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचेही पालकमंत्री म्हणाले. संभाव्य धोका वाढू नये म्हूणन डॉ़ उल्हास पाटील रुग्णालय अधिग्रहीत केल्याचे त्यांनी सांगितले़ जळगावचा मृत्यूदर हा महाराष्ट्र व देशाच्या मृत्यूदरापेक्षा अधिक आहे़ यातील १३ रूग्ण मृतावस्थेत आले मात्र, अन्य रूग्णांचा जो मृत्यू झाला तो दरही मोठा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ ढाकणे यांनी सांगितले़

जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक असल्याने त्या सुविधा जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सोबतच जिल्हा रुग्णालयात जे उपचार केले जातात व ज्या सुविधा आहे, त्या सर्व सुविधा व उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही रुग्णाला अडचण येणार नाही.
- डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी.

Web Title: The district general hospital itself disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.