जिल्ह्यातील शिंदोळ्या झाल्या नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:40+5:302021-06-21T04:12:40+5:30
आजच्या सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी लहान मुले कच्ची फळं खडकावर घासून, आतील पांढरे शुभ्र नरम बी खायचे, खोबऱ्यासारखी ...
आजच्या सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी लहान मुले कच्ची फळं खडकावर घासून, आतील पांढरे शुभ्र नरम बी खायचे, खोबऱ्यासारखी चव लागायची. मे महिन्याची सुट्टी असायची, सकाळी झुंजूमुंजू असताना लहान मुलांचा चमू पिशव्या घेऊन शिंदी बनात धाव घ्यायचा.
पोपट, साळुंक्या फक्त पिकलेल्या झाडावरच गलका करायचे, तेथे झाडाखाली शिंदोळ्यांचा सडा पडलेला असायचा, त्यामुळे अनायासे दगड न मारता आयत्या शिंदोळ्या पिशवीत भरून घरी यायचे. नंतर वाड्यात सर्वांना पसा पसा भर वाटल्या जायच्या. शिंदीच्या फड्यापासून टोपले, टोमे, लहान मोठी केरसुणी, बैलगाड्या साठी लहान मोठी ताटी विणली जात. सुकलेल्या फड्यांचा सरपणासाठी वापर होई.
१९६४ मध्ये गुजराथी तरवाडे (झाडावर चढणारे) आले. त्यांनी ‘निरा’विक्री सुरू केली. निरा सूर्योदयापूर्वीच प्यायची असते. त्यामुळे सकाळीच गावकऱ्यांसोबत पंचक्रोशीतील लहान थोर, बाया बापडे गर्दी करायचे. दुर्दैव १९६६ नंतर ‘ताडी’ विक्री सुरू झाली, आंध्र, तामिळनाडूच्या तरवाड्यांनी शिंदी झाडांचा अर्क(रस) ओरबाडून काढला. परिणामी, हे वृक्ष सुकू लागली. त्याच दशकात विहीर, बोअरवेलद्वारा पाणी उपसा जलसिंचन सुरू झाले. पाण्याची पातळी शंभर फुटांपेक्षा खाली गेली. त्यामुळे नद्या, नाले, ओढे यांचे झीर आटले अन् शिवारातील झाडेझुडपे सुकायला लागली. त्यात काही निष्क्रिय शेतकऱ्यांनी झाडांची विक्री केली.
आज फक्त २० ते २५ टक्के निसर्ग संपत्ती राहिली आहे. त्या अनेक शिंदीचे वृक्ष केवळ शो पीससाठी राहिले आहेत. आजच्या पिढीला या वृक्षाच्या संवर्धनाबाबतही फारसे देणघेणं वाटत नाही. ‘आजही जेव्हा कोकिळेचे कुहूकुहूचे मधुर स्वर कानी पडतात, तेव्हा मनं बालपणाच्या सावटा सोबत ‘शिंदी बनात’ धावत जाते.’
- दामोदर चौधरी, झुरखेडा, ता.धरणगाव.