जिल्हा रुग्णालय पुन्हा गोदावरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:57 AM2020-06-10T10:57:56+5:302020-06-10T10:58:08+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे पुन्हा आदेश : कोविड रुग्णासाठी ४०० बेड आरक्षित
जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालय शाहू महाराज रुग्णालयात स्थलांतरीत केल्याच्या दोनच दिवसात पुन्हा हे रुग्णालय पुन्हा गोदावरी फांऊडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सुरु करण्याचे सुधारीत आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. हे रुग्णालय आधी कोविडसाठी अधिग्रहीत असून तेथे ४०० बेड वगळता इतर बेड सामान्य रुग्णांसाठी असतील. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या रुग्णालयात ४०० बेड कोराना रुग्णांसाठी आरक्षित असून त्यातील २८ अतिदक्षता विभागात तर १५० आॅक्सिजन तर इतर अत्यावश्यक बाब म्हणून अधिग्रहीत असतील. हे ४०० बेड वगळता इतर बेड अत्यावश्यक सेवा, जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा रुग्णांना मिळतील.
दरम्यान, आजपासून सामान्य रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या सुविधा व उपचार या रुग्णालयात मिळणार आहेत.
रुग्ण सेवेसाठी हॉस्पिटल नेहमीच तयार
आमच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णांवर येथे विविध योजनांमध्ये व मोफत उपचार केले जातात. शेजारील बुलढाणा, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार तसेच मध्यप्रदेशातील बºहाणपूर, खंडवा या भागातून देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी येतात. लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यास नकार मिळाल्यानंतर आमच्याकडे उपचार करण्यात आले. सर्वसामान्यांची सेवा देण्यासाठी रुग्णालय बांधिल आहे.
- डॉ उल्हास पाटील,अध्यक्ष, गोदावरी फांऊडेशन
गोंधळाच्या स्थितीबाबत ‘लोकमत’ ने वेधले लक्ष
सर्वसामान्य रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याचेही आदेश प्रशासनाने काढले होते, मात्र डॉ. पाटील हॉस्पिटल कोरोनासाठी अधिग्रहण करण्यात आल्याच्या आदेशानंतर सर्वसामान्य रुग्णांनी कुठे जावे, असा प्रश्न ‘लोकमत’ ने वृत्तातून उपस्थित केला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी पुन्हा सुधारीत आदेश काढून ४०० बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत.