जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशिन पाच दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:39 PM2017-12-27T12:39:45+5:302017-12-27T12:42:34+5:30
रुग्णांचे हाल
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27- जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण (एक्स-रे) मशिन गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने येथे रुग्णांचे हाल होत आहे. विशेष म्हणजे मारामारीच्या रुग्णांचा अहवाल नसल्याने गुन्हा नोंदणे व पुढील प्रक्रियेत अडथळे येत आहे.
जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशिनवर दररोज 70 ते 80 एक्स-रे काढले जातात. जिल्हाभरातून येणा:या रुग्णांची तसेच अपघातातील रुग्णांचीही संख्या जिल्हा रुग्णालयात जास्त असते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून हे मशिन बंद पडल्याने एक्स-रे निघतच नाही.
जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशिन 43वर्षापूर्वीचे असून ते अत्यंत जुने झाले आहे. आता ते बंद पडल्यानंतर तंत्रज्ञांना बोलावून त्याची पाहणीही करण्यात आली. मात्र त्यासाठी लागणारे सुटे भाग (पार्ट) मिळत नसल्याने अडचणी येत आहे. सध्या बाजारात हा पार्ट मिळणे कठीण असल्याने अशाच प्रकारच्या जुन्या मशिनचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रुग्ण संख्या वाढू लागली
एक्स-रे होत नसल्याने 7, 8 व 12 क्रमांकाच्या कक्षात अपघात, मारामारीचे रुग्ण वाढू लागले आहे. एक्स-रेच निघत नसल्याने पुढील उपचार करण्यासही अडचणी येत आहे.
मारामारीचे गुन्ह्यांबाबत संभ्रम
जिल्हा रुग्णालयात मारामारीचे रुग्ण आल्यानंतर मार लागला असल्यास एक्स-रेद्वारे अहवाल दिला जातो. मात्र एक्स-रेच बंद असल्याने अहवाल मिळत नाही व गुन्ह्यामध्ये कलम लावण्याबाबतही अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचे काय?
जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांची तपासणी होऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. मात्र या आठवडय़ात एक्स-रे मशिन बंद असल्याने 27 रोजी दिव्यांगांची तपासणी कशी होणार असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पुन्हा चकरा माराव्या लागतात की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
सिटीस्कॅननंतर आता एक्स-रे नाही
जिल्हा रुग्णालयात आता सहा वर्षानंतर सिटीस्कॅन मशिन कार्यान्वित झाले. ते सुरू होत नाही की आता एक्स-रे मशिन बंद पडल्याने रुग्णांची फिरफिर पुन्हा सुरू झाली आहे.
एक्स-रे मशिन बंद असल्याने त्यासाठी तंत्रज्ञांना बोलविण्यात आले व त्यांना ते दाखविण्यात आले. मशिन जुने असल्याने पार्ट मिळण्यास अडचणी येत आहे. मात्र त्यावर मात करून मशिन लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता.