जि.प.तील औषध खरेदी, वैद्यकीय बिलांची अडवणूक विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:59 AM2019-06-20T11:59:21+5:302019-06-20T11:59:53+5:30
एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केली लक्षवेधी
जळगाव : जि.प.च्या आरोग्य विभागातील औषध व इतर खरेदीतील गैरव्यवहार व वैद्यकीय बिलांसाठी होणारी अडवणुकीची तक्रार थेट विधानसभेत पोहचली असून या विषयी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी लक्षवेधी उपस्थित केली. या विषयी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून वस्तूस्थिती मागविली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी अडवणूक केली जात असल्याची बाब समोर आल्याचा मुद्दा एकनाथराव खडसे यांनी १९ रोजी विधानसभेत मांडला. या सोबतच औषध खरेदी, साहित्य व इतर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले. या सोबतच इतरही तक्रारी वाढत असल्याने हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींगमध्ये घोळ यासह विविध ठपके ठेवत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी डॉ. कमलापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला आहे.