५० लाखाच्या बेनामी ठेवी प्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेच्या कक्ष अधिकाऱ्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:12 PM2019-06-20T12:12:29+5:302019-06-20T12:13:18+5:30
एसीबीने केला गुन्हा दाखल
जळगाव : ग.स.सोसायटीत विभागीय अधिकारी किरण भिमराव पाटील यांच्या नावाने ठेवलेल्या बेनामी ५० लाख रुपयांच्या संपत्तीप्रकरणी संस्थेचे तत्कालीन चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी सुनील अभिमन सूर्यवंशी व किरण पाटील या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन सूर्यवंशी व पाटील या दोघांविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम १३ (१) (१) सह १२ व भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील सूर्यवंशी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष असताना १४ जुलै २०१२ ते ते १ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत सोसायटीतील सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचा मुलगा तथा संस्थेचे विभागीय अधिकारी किरण भिमराव पाटील यांच्याशी संगनमत करुन त्यांच्या नावाने सोसायटीची शाखा क्र.१ बळीराम पेठे येथे बनावट खाते उघडले होते. नंतर १२ फेब्रुवारी २०१६ रोजी नाममात्र बचत ठेव पावतीवर बनावट दस्ताऐवज तयार करुन सही करुन अष्टचक्र ठेव योजनेत ५० लाखाचा बेनामी गुंतवणूक केली. त्यानंतर १९ सप्टेबर २०१६ या नाममात्र ठेव पावतीवर बनावट सही करुन व्याजासह ५१ लाख ७८ हजार ८८७ रुपये काढून घेतले होते. या कामात किरण पाटील यांनी सूर्यवंशी यांना सहाय्य केले.
खंडपीठाने दिले होते आदेश
या बेनामी ठेव प्रकरणी रावसाहेब मांगो पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर १० जून रोजी सुनावणी झाली असता या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करुन चौकशी करुन संबंधित व्यक्तींविरुध्द कारवाई करून त्याचा अहवाल खंडपीठात सादर करण्याचे आदेश न्या.टी.व्ही.नलावडे व न्या.के.के.सोनवणे यांनी दिले होते. या आदेशाची प्रत प्राप्त होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांच्याविरुध्द फिर्याद दिली. या गुन्ह्याच तपासही ठाकूरच करीत आहेत.