अमळनेर येथील तलाठी मारहाण प्रकरणाशी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा संबध, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:13 PM2018-01-21T12:13:09+5:302018-01-21T12:26:20+5:30
महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला अवैध वाळू आणणे योग्य आहे का?
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश पाटील यांच्यावर 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या मारहाणीशी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा थेट संबंध असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. या प्रकरणातील मारहाण करणा-यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या बाबत शनिवारी दुपारी जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलताना अनिल भाईदास पाटील यांनी या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी ते म्हणाले की, 18 जानेवारी रोजी अमळनेर येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार होता. प्रांताधिकारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ हे कार्यक्रमस्थळी पाहणी करीत होते. त्या वेळी वाळू वाहतूक करणा:या ट्रॅक्टरवर तलाठय़ांनी कारवाई करून तहसील कार्यालयात नेत होते. मात्र त्यावेळी 20 ते 25 जणांनी त्यास विरोध करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेले. त्या वेळी तलाठय़ांनी विरोध केला असता 20 ते 25 जणांनी उदय वाघ यांना या बाबत कळविले. त्याबाबत काय सूचना मिळाल्या माहित नाही, मात्र त्यानंतर तलाठय़ांना बेदम मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात भाजपाचे अमळनेर शहराध्यक्ष शीतल देशमुख व इतर 20 ते 25 भाजपाच्या कार्यकत्र्याचा समावेश असून मारहाण करणा-यांना अटक करावी. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा थेट संबंध असल्याचाही आरोप अनिल भाईदास पाटील यांनी करीत महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमाला अवैध वाळू आणणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला.
या प्रकरणाच्या फेर चौकशीची मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केली असून अनिल भाईदास पाटील यांच्या आरोपात तथ्य नाही. अमळनेर तालुक्यातील हे तलाठी राष्ट्रवादीचेच असून त्यांच्याशी हातमिळवणी करून असे खोटे प्रकार केले जातात. दोन-तीन महिन्यांपूर्वीदेखील भूषण महाजन हे घराच्या कामासाठी वाळू नेत असताना त्यांनी राष्ट्रवादीला मतदान केले नाही, म्हणून तलाठय़ांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.