सहा महिन्यांपासून जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:30+5:302021-05-09T04:17:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही महिने आधी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री असतील, असा निर्णय शासनाने घेतला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही महिने आधी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री असतील, असा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर आतापर्यंत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठकच झाली नसल्याचे समोर आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकदाही या समितीची बैठक बोलावलेली नाही.
पालकमंत्री यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर संकुल समितीसमोर पेच निर्माण झाला होता. धनादेशांवर या आधी जिल्हाधिकारी आणि सचिव म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी यांची स्वाक्षरी होती. मात्र पालकमंत्री अध्यक्ष झाल्यावर काय करायचे, याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी याबाबत क्रीडा संचालनालयाला पत्र लिहिले आणि मार्गदर्शन मागवले. त्यानुसार आता पुन्हा एकदा धनादेशांसाठीचे अधिकार जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनाच देण्यात आले आहेत. मात्र, आता जिल्हा क्रीडा संकुलाच्या घटनेत बदल करावे लागतील आणि ते धर्मादाय आयुक्त कार्यालयांपुढे सादर करावे लागणार आहेत.
असे असले तरी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून एकदाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी क्रीडा संकुल समितीची बैठक बोलावलेली नाही. त्यामुळे क्रीडा संकुलाशी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चाच झालेली नाही. सध्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन असला तरी त्या आधी जळगावच्या पालकमंत्र्यांकडे साडेचार ते पाच महिने होते. त्या काळात त्यांनी एकदाही क्रीडा संकुल समितीची बैठक बोलावली नाही.