नागरिकांनी साथ दिल्यास जिल्हा कोरानामुक्तच राहील - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:40 PM2020-04-14T23:40:06+5:302020-04-14T23:40:16+5:30
‘लोकमत’च्या मुलाखतीत उपाययोजनांची माहिती, परिस्थिती नियंत्रणात
जळगाव : जिल्हाभरात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले होते़ अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेने पूर्ण दक्षता घेऊन त्यांचे कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करून परिस्थिती नियंत्रणात आणली़ पहिल्या रुग्णाचाही अहवालही निगेटीव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त म्हणू शकतो, मात्र, यात लॉकडाउनचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे़ शासकीय रुग्णालयात सध्या पूर्ण कॉर्पोरेट रुग्णालयासारख्या सुविधा आहे़़, स्थानिक पातळ्यांवर कोव्हीड केअर सेंटरचे नियोजन आहे, त्यामुळे नागरिकांनी साथ दिल्यास जिल्हा आगामी काळात कोरोनामुक्तच राहील, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे़ त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध उपाययोजनांची माहिती दिली़
प्रश्न : सद्यस्थितीत परिस्थिती कशी व आपल्याकडे उपाययोजना कशा?
उत्तर : पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याने शिवाय तो राहत असलेल्या परिसरातही कोणालाही लक्षणे नाहीत, त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, असे म्हणता येईल़ आपल्या जिल्ह्यात २५२ लोक परदेशातून आलेले होते़ त्यांचा चौदा दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी संपलेला आहे़ यासह ५० हजारांपर्यंत विविध बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतरित झालेले परतले आहेत़ त्यांच्या तपासण्या झाल्या असून कोणाला लक्षणे नाहीत़
प्रश्न : संशयितांच्या मृतांचा आकडा वाढत आहे, कारण काय?
उत्तर : सारी अर्थात सिव्हीअर अॅक्युड रेस्पीरेटरी इलनेस या आजाराची लक्षणे ही कोव्हीड सारखीच असतात़ या आजाराचा प्रार्दुभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आढळत आहे़ अशा स्थितीत या आजाराचे रुग्णही कोरोना संशयितच मानले जातात़ मात्र, त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह असतात़ प्रतिकारक क्षमता कमी असणे, अन्य व्याधी असणे, शिवाय अगदी गंभीरावस्थेत दाखल ही मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची परिस्थिती होती़ मात्र, त्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, लवकर उपचार घ्यावेत़
प्रश्न : अहवालास होणाऱ्या विलंबाने काय परिणाम होतात?
उत्तर : धुळ्यात किट व काही तांत्रिक अडचणी होत्यात शिवाय तपासण्यां अधिक असल्याने लोड होता़ औरंगाबादलाही हीच परिस्थिती होती़ त्यामुळे अहवालास विलंब झाला़ यामुळे संबंधित रुग्ण व नातेवाईकांच्या मानसिकस्थितीवर परिणाम होतो़ आरोग्य कर्मचाऱ्यांना तर सेवा द्यावीच लागते़
प्रश्न : कोरोना रुग्णालय कुठपर्यंत राहील?
उत्तर : मार्चच्या सुरुवातीला भारतात तीन रुग्ण होते़ दीड महिन्यात तो आकडा साडेनऊ हजारांवर गेला अशा स्थितीत लॉकडाऊनचे पालन न केल्यास हा प्रार्दुभाव अतिशय वेगाने होऊ शकतो़ त्यामुळे परिस्थित नियंत्रणात येईपर्यंत हे रुग्णालय कोरोना रुग्णालय राहील, त्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी असेल़