जिल्ह्यात उद्यापासून अनलॉक, मात्र पूर्णपणे मोकळीक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:35+5:302021-06-06T04:12:35+5:30
स्टार ७८१ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्यासह ऑक्सिजन बेडदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनलॉकच्या ...
स्टार ७८१
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्यासह ऑक्सिजन बेडदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने अनलॉकच्या निकषांमध्ये जिल्हा पहिल्याच स्तरावर येत आहे. जिल्ह्यात सोमवारपासून बाजारपेठ अनलॉक होणार आहे. मात्र, असे असले तरी पूर्णपणे मोकळीक दिली जाणार नाही, असा इशारादेखील देण्यात आला आहे. गेल्या वर्षी पहिल्या अनलॉक वेळी सूट मिळताच बाजारपेठेत व सामाजिक समारंभामध्ये उसळलेली गर्दी पाहता त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.
सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर खाली आला आहे. यामध्ये ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांच्या खाली आहे व ७० टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये काहीसे निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर १ जूनपासून जिल्ह्यात शिथिलता मिळाली. आता राज्य शासनाने पाच टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेतला असून या पाच टप्प्यांतील पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्हा येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सोमवार, ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पूर्ण मोकळीक नाही
सोमवारपासून अनलॉक होणार असले तरी पूर्णपणे मोकळीक न देता काहीसे निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. यामध्ये जिल्ह्याची स्थिती पाहून नियमावली तयार करण्यात येत आहे. ज्या ठिकाणावरून संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे, अशा घटकांवर विशेष लक्ष राहणार आहे. यात लग्न, सामाजिक समारंभ यांच्यावर निर्बंध राहण्याचे संकेत दिले जात आहेत.
शासनाने कुठले पाच स्तर ठरविले आहेत?
१) पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या स्तरात येईल.
२) पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात येईल.
३) पॉझिटिव्हिटी रेट पाच ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात येईल.
४) पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग चौथ्या स्तरात येईल.
५) पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पाचव्या स्तरात येईल.
कोरोनाचे एकूण रुग्ण - १४०६०४
बरे झालेले रुग्ण - १३४२२७
एकूण मृत्यू - २५४८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ३८२९
सध्या ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण - ४३६
सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट - १.५० टक्के
काय सुरू राहील?
जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक सुरू होऊन दुकानांच्या वेळा वाढण्यासह हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, आठवडे बाजार सुरू होऊ शकतात. मात्र, त्यावर काहीसे निर्बंध राहणार आहेत.
काय बंद राहील?
जास्तीत जास्त शिथिलता देण्याचा प्रयत्न असला तरी लग्न समारंभ, सामाजिक समारंभ व गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लागू केले जाणार आहेत. यामध्ये लग्नसमारंभामधून अधिक संसर्ग पसरत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजून तरी पूर्णपणे लग्न समारंभांना मोकळीक मिळणे कठीण आहे.
------------------------
राज्य शासनाने ठरविलेल्या निकषानुसार जळगाव जिल्हा पहिल्या टप्प्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त शिथिलता देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पूर्णपणे मोकळीक यावेळी दिली जाणार नाही. यामध्ये दुकानांच्या वेळा वाढतील. लग्न समारंभ, सामाजिक समारंभांवर निर्बंध राहतील. जिल्ह्यातील एकूण स्थितीचा विचार करून नियमावली तयार केली जात आहे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.