जलशक्ती अभियान कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांना खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:41 PM2019-08-10T23:41:00+5:302019-08-10T23:41:36+5:30
मोबाईवर बोलणे खटकले। आमदार जावळे यांनी व्यक्त केली नाराजी
यावल : यावल येथे आयोजित जलशक्ती अभियान कार्यशाळेत गांभीर्याने सुरू असलेल्या चर्चेप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे दोन वेळा मोबाईलवर बोलत असल्याने महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी त्यांना खडसावत अगोदर मोबाईल बंद करा कार्यशाळेचा आपणास गांभीर्य नाही काय? असा विचारत खडसावले.
यावल येथे शनिवारी धनश्री चित्रमंदिरात जलशक्ती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार रक्षा खडसे, महाराष्टÑ राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, ज़ि प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची उपस्थिती होती.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलले जलशक्ती अभियान लोकसहभागाशिवाय पुर्ण होणार नाही. जिल्हयात फक्त यावल-रावेर या दोनच तालुक्यात हे अभियान राबविले जात आहे त्याचे कारण या दोन तालुक्यातील भुगर्भातील जलपातळी ही चिंतेची बाब असल्याने अभियान राबविण्यासाठी प्रत्येक नागरीकांसह गावपातळी व तालुका पातळीवरील पदाधिका-यांनी सहकार्य करून यशस्वी करावे असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी या कार्यशाळेत केले. यावल-रावेर तालुक्यातील पाणी पातळीची समस्या गंभीर आहे त्या दृष्टीने आणि भावी पिढीसाठी ही योजना यशस्वी करण्यासाठी गावतपातळीवरील पदाधिका-यांनी तसेच विविध संस्थांनी सहभागी होवून ती यशस्वी करावी, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.
दोन तालुक्यात भीषण स्थिती
प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल-रावेर तालुक्यातील भुगर्भातील जलपातळीची भीषणता व्यक्त करतांना सांगीतले की, गेल्या काही वर्षापासून पाण्याअभावी केळी उत्पादक ऐन हंगामातील केळी उपटून फेकत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावे लागत आहे. यासह त्यांनी आज आणि उद्यासाठी हे अभियान राबविणे महत्वाचे आहे.
जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जलशक्ती अभियानाचे महत्व आपल्या भाषणात विषद केले.
कार्यशाळेत भूजल परीक्षण विभाग, कृषी विभाग, वनविभाग, फैजपुर नगरपालीका या विविध कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजना चित्रफितीव्दारे दाखविण्यात आल्या. ज़ि प. सदस्य प्रभाकर सोनवणे, ज़ि प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, डांभुर्णी सरपंच पुरूजीत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर ज़ि प. सदस्य रविंद्र पाटील, सविता भालेराव, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, प. स. सदस्य दिपक पाटील, तर कार्यकमास नगरसेवक , तालुक्यातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पं. स. सदस्य, राजकीय पदाधिकारी व विविध यंत्रणा प्रमुख व जलशक्ती अभियानाचे संबधित सर्व प्रमुख उपस्थित होते.
मग कार्यशाळेचा आयोजन कशासाठी
आमदार हरीभाऊ जावळे हे मनोगत व्यक्त करत असताना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचा उल्लेख करून दोन वेळा बरं का जिल्हाधिकारी साहेब , बरं का जिल्हाधिकारी साहेब असे केळी उत्पादकांच्या परिस्थितीची माहिती देतांना म्हणाले, मात्र याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते ते मोबाईलवर बोलण्यात मग्न असल्याचे लक्षात येताच आमदार जावळे यांनी अहो कलेक्टर साहेब तुम्ही पहिल्यांदा मोबाईल बंद करा कार्यक्रमात मी पाहतो आहे तुम्ही सारखे मोबाईलवरच बोलत आहात मग या कार्यशाळेचे आयोजन कशाला पाहीजे असे म्हणून खडे बोल सुनावले. आमदारांचा नाराजीची सुर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी ढाकणे यांनी तात्काळ मोबाईल बंद केला.