तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार
By admin | Published: February 10, 2017 01:08 AM2017-02-10T01:08:55+5:302017-02-10T01:08:55+5:30
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : म्हसावदमधील सभेने जि.प. निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
जळगाव : जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी केंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळविले. त्यातून जळगाव जिल्ह्यातही कामे सुरू झाली असून आगामी तीन वर्षात जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करून जळगावचा कायापालट करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद येथे आयोजित जाहीर सभेत गुरुवारी दिले.
भाजपातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हसावद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेने झाला. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह गिरीश महाजन, एकनाथराव खडसे उपस्थित होते.
ख:याअर्थाने विकास
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे जलसंपदा खाते होते. त्यांनी पाच वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास केला. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा विकास रखडला. त्यानंतर आताच्या सरकारमध्ये जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. त्यांनी ख:या अर्थाने मोठय़ा प्रमाणात कामे सुरू केली. केंद्र सरकारकडून त्यांनी 26 हजार कोटी रुपये मिळविले. या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाची अनेक कामे सुरू झाली आहेत. गिरणा नदीवरील 7 बलून बंधारे, म्हसावद परिसरातील लमांजन बंधारा दुरुस्ती, अंजनी धरणाची क्षमतावाढ या कामांचा त्यात समावेश आहे.
जळगाव नक्कीच ‘जलयुक्त’ गाव होईल
खडसे यांनी जळगावचा कायापालट करण्यास जी सुरुवात केली होती, ती कामे सुरू ठेवून आगामी तीन वर्षात जळगावचा कायापालट करू. जळगाव जिल्ह्यासाठी आम्ही केवळ योजना आणल्या नाही तर त्या पूर्ण करण्यासाठी निधीदेखील दिल्याचे त्यांनी सांगितले. तापी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव ‘जलयुक्त गाव’ होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.