चहा पिण्यासाठी जिल्ह्याला लागणार दररोज पाच हजार कुल्हड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:02+5:302020-12-12T04:33:02+5:30
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या कपमधून चहा विक्री करण्याऐवजी संबंधित विक्रेत्यांना मातीच्या कुल्हडमधून चहा विक्री करण्याचे आदेश ...
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या कपमधून चहा विक्री करण्याऐवजी संबंधित विक्रेत्यांना मातीच्या कुल्हडमधून चहा विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी, दादर, ठाणे,कल्याण व नाशिक रेल्वे स्टेशनवरही कुल्हडमधून चहा विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणचे चहा विक्रेते ठाणे जिल्ह्यातील कुंभारांकडून कुल्हड विकत घेऊन, स्टेशनवर कुल्हड सात रुपये व त्यातील चहाचे ७ रुपये असे एकूण १४ रुपयांना चहा विक्री करत आहेत. विशेष म्हणजे जे ग्राहक कुल्हडची मागणी करतील, अशा ग्राहकांनाच कुल्हडमधून चहा देण्यात येत असून, इतर ग्राहकांना प्लास्टिकच्या कपातूनही चहा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील एकूण मोठे स्थानक : ५
जिल्ह्यात आदेशाची प्रतीक्षा :
जळगाव जिल्ह्यात भुसावळ रेल्वे विभाग येत असून, या विभागात भुसावळसह रावेर, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव हे मोठे स्टेशन आहेत. अमळनेर स्टेशन हे जिल्ह्यात येत असले तरी, ते पश्चिम रेल्वेत मोडते. त्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थानेही पाच मोठी स्टेशन आहेत; मात्र जिल्ह्यातील या पाचही स्टेशनवर कुल्हडमधून चहा विक्री करण्याबाबत कुठलेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे येथील प्रवाशांना कुल्हडमधून चहा कधी प्यायला मिळणार, याची प्रतीक्षा लागून आहे.