अर्ध्या टक्क्याने वाढला जिल्ह्याचा रेमडेसिविर पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:44+5:302021-05-13T04:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारकडून जिल्ह्याला मिळणारा रेमडेसिविरचा पुरवठा अर्ध्या टक्क्याने वाढविण्यात आला आहे. १० मेच्या आधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य सरकारकडून जिल्ह्याला मिळणारा रेमडेसिविरचा पुरवठा अर्ध्या टक्क्याने वाढविण्यात आला आहे. १० मेच्या आधी राज्याला मिळणाऱ्या रेमडेसिविरच्या व्हायल्सपैकी फक्त दोन टक्के रेमडेसिविर जळगाव जिल्ह्यासाठी मिळत होत्या. मात्र, दहा मेपासून अडीच टक्के व्हायल्स जळगाव जिल्ह्याला मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. त्यामुळे रेमडेसिविर मिळण्याची अडचण काही प्रमाणात तरी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांसह सर्वत्रच रेमडेसिविरची मागणी वाढत होती. या आधी राज्याला मिळणाऱ्या रेमडेसिविरमधून जिल्ह्याला फक्त दोनच टक्के रेमडेसिविर दिले जात होते. आता जिल्ह्याला अडीच टक्के रेमडेसिविर दिली जाणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आणि राज्य सरकारला मिळालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुलनेत जिल्ह्याला रेमडेसिविर दिले जातात. ते दररोज अडीच टक्केच येतील, असे नाही. कधी-कधी ते जास्तदेखील येऊ शकतात. त्यानुसार त्याचे वितरण केले जाते. सरासरीनुसार जिल्ह्याला राज्याच्या वाट्यातून अडीच टक्के रेमडेसिविर मिळतात.’
ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जळगाव जिल्ह्यात जास्त असतानाही जिल्ह्याला फक्त दोन टक्केच रेमडेसिविर दिले जात असल्याचे आता समोर आले आहे.
असे केले जाते रेमडेसिविरचे वितरण
राज्याकडून १० मेपासून जिल्ह्याला अडीच टक्के रेमडेसिविर मिळत आहेत. त्यातून ज्या रुग्णालयांनी थेट कंपनीकडून रेमडेसिविर मागवली आहेत, त्यांना वगळूनच उरलेल्या रुग्णालयांमध्ये त्यांच्या मागणी आणि रुग्णसंख्येच्या गरजेनुसार वितरण केले जाते. त्याची माहिती एनआयसीच्या तक्त्यानुसार भरली जाते आणि त्यानुसारच रुग्णालयांना रेमडेसिविर दिले जाते. या आलेल्या रेमडेसिविरपैकी १० टक्के साठा हा हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येतो.