जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:10 PM2020-09-09T20:10:10+5:302020-09-09T20:10:19+5:30
जळगाव - जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या ...
जळगाव - जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, यासाठी शासकीय कोरोना तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी. असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पाटनशेट्टी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. निकुंभ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री. गमे म्हणाले, जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चाळीसगावसह ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने या क्षेत्राबरोबरच जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राची आखणी व्यवस्थित करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या बिल्डींग, सोसायटींना अत्यावशयक सेवा पुरविण्याचा विचार करावा. तसेच प्रतिबंधित क्षेत्राचे झोन तयार करा त्यावर नियंत्रणासाठी पोलीस विभागाच्या बीट मार्शलची मदत घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींच्या तातडीने तपासण्या करा. तपासणी अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील तपासण्यांची संख्या वाढवावी. त्यासाठी 24 तास प्रयोगशाळा कार्यान्वित ठेवावी. आवश्यकतेनुसार तंत्रज्ञांची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान 75 कुटुंबांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. तर रुग्णांच्या संपर्कातील किमान व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.
जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढते असले तरी मृत्यूदर कमी होत आहे ही दिलासादायक बाब आहे. मात्र होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करुन मृत्यूंच्या मागील कारणांचा शोध घ्यावा. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पण भविष्यात अडचण येवू नये याकरीता व्हेन्टिलेटर वापराचे सूक्ष्म नियोजन करावे. पीएम केअर्सकडून प्राप्त झालेले सर्व व्हेन्टीलेटर त्वरीत कार्यान्वित करावे. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावरही व्हेन्टिलेटर उपलब्ध करून द्यावेत. तसेच वाढती रुग्ण संख्या पाहता अतिदक्षता विभागासह ऑक्सिजनयुक्त बेड सज्ज ठेवावेत. उपचारासाठी अधिकचे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी जम्बो सिलिंडरला पर्याय म्हणून मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या उपलब्ध करुन घ्याव्यात. कोविडसोबतच नॉन कोविड रुग्णांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या. गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होऊन त्यांचेवर तातडीने उपचार होतील आलेल्या रुग्णांला चांगली सेवा वागणूक मिळेल याची दक्षता घेण्याच्याही सुचनाही देऊन प्रशासनाने केलेल्या नियोजनाचेही आयुक्तांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्ह्यातील कोरोनाची सद्याची परिस्थिती, भविष्याचे नियोजन याबाबत माहिती देतांना सांगितले की, आवश्यकतेनुसार अजून 150 आयसीयु बेडचे नियोजन आहे. जिल्ह्यात 750 बेड शासकीय खर्चाविना तयार झाले आहे. कोविड रुग्णालयात 32 बेड असिस्टंट नेमले आहे त्याचा रुग्णांना चांगला फायदा होत आहे. नातेवाईक व रुग्ण यांच्यातील संवादासाइी व्हिडीओ कॉलींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नॉन कोविड रुग्णांसाठी आयुर्वेद महाविद्यालयात 100 बेड विविध सुविधांसह उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत दिली.
विभागीय आयुक्तांचा कोविड सेंटरमधील रुग्णांशी व्हिडिओ कॉलवर संवाद
नमस्कार, कोणत्या गावचे आहे. किती दिवस झाले रुग्णालयात येऊ न, सगळया सुविधा मिळतात ना. तब्बेत कशी आहे, काळजी घ्या. असा संवाद आढावा बैठक सुरु असतानाचा विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांशी साधून त्यांना धीर दिला.
जिल्हा सामान्य रुगणालयाची व कोविड सेंटरची पाहणी
बैठकीनंतर विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी जिल्हा सामान्य रुगणातील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील वॉर रुम, अतिदक्षता विभागास भेट देऊन रुग्णांना मिळत असलेल्या सुविधा व औषधोपचाराची पाहणी केली. तसेच सामान्य रुग्णालयात सुरु असलेल्या व झालेल्या कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी इकरा एज्युकेशन सोसायटीमधील कोविड सेंटरलाही भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे आदि उपस्थित होते.