एक लाखाचे बनावट बियाणे विक्रीस आणणाऱ्या शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्षाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 08:53 PM2023-05-24T20:53:39+5:302023-05-24T20:56:40+5:30
चोपडा : गुणवत्ता नियंत्रण विभागाची धडक कारवाई.
संजय सोनवणे, चोपडा जळगाव : चोपड्यात स्वदेशी - ५ कापूस बनावट बियाणांची ९५ पाकिटे आढळून आली. ही बियाणे हे रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (३५, रा. वर्डी, ता. चोपडा) याने विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या बियाणांची बाजारात किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
चोपडा-धरणगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली होती. शहर पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये तपासणी केली असता संदीप पाटील हा त्याचे वाहन नादुरुस्त झाले म्हणून दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेवून गेल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर अमोल राजपूत यांनी दिली. त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी- ५ संकर देशी कापूस बियाणे असलेली ९९ हजार ७५० रु. किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली.
तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सायंकाळी त्याला वर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. बोगस बियाणांच्या रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत, याचा शोध घेण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सपोनि संतोष चव्हाण यांनी सांगितले.