नोव्हेंबरमध्ये आकाशात सुद्धा दीपावली, गुरु पृथ्वीजवळ येणार, उल्का वर्षावसह पाहता येणार अनेक ग्रहांची युती

By Ajay.patil | Published: November 2, 2023 04:35 PM2023-11-02T16:35:53+5:302023-11-02T16:36:40+5:30

या महिन्यात अनेक खगोलीय घटना घडणार असून, यामुळे नोव्हेंबर महिना खगोलप्रेमींसाठी चांगला पर्वणीचा ठरणार आहे.

Diwali also in the sky in November, Jupiter will come closer to earth, many planetary alliances can be seen with meteor showers | नोव्हेंबरमध्ये आकाशात सुद्धा दीपावली, गुरु पृथ्वीजवळ येणार, उल्का वर्षावसह पाहता येणार अनेक ग्रहांची युती

नोव्हेंबरमध्ये आकाशात सुद्धा दीपावली, गुरु पृथ्वीजवळ येणार, उल्का वर्षावसह पाहता येणार अनेक ग्रहांची युती


जळगाव : एकीकडे दिवाळी जवळ आल्यामुळे सर्वदूर प्रकाशाची झलक पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात आकाशात देखील दिवाळी पाहण्याची संधी खगोलप्रेमींसाठी चालून आली आहे. या महिन्यात अनेक खगोलीय घटना घडणार असून, यामुळे नोव्हेंबर महिना खगोलप्रेमींसाठी चांगला पर्वणीचा ठरणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात अनेक खगोलीय घटना होणार असून, यामध्ये आपल्या ग्रहमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरु पृथ्वी जवळ येणार आहे. यामुळे हा ग्रह तेजस्वी दिसणार आहे. त्याचप्रमाणे पहाटे शुक्र ग्रह हा देखील अधिक तेजस्वी दिसणार आहे. चंद्राची शुक्र, शनी आणि बुध ग्रहासोबत युती दिसणार आहे. तर २ उल्का वर्षाव आणि धूमकेतू सुद्धा दिसणार असल्याने जणू आकाशात दिवाळीच साजरी होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

खगोलीय घटनांचे व्हा साक्षीदार...
- ३ नोव्हेंबरला गुरू पृथ्वी जवळ येत असून, संपूर्ण महिन्यात पूर्वेला संध्याकाळी साध्या डोळ्यांनी सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे. तर दुर्बिणीने गुरूचे ४ चंद्र स्पष्ट पाहता येणार आहेत.
- ९ नोव्हेंबरला पहाटे पूर्वेला शुक्र - चंद्राची युती दिसेल. तेही अगदी जवळची युती पाहण्याची दुर्मीळ संधी आहे.
- १० नोव्हेंबरला सी-२०२३एच२ (लेमन) हा धूमकेतू पृथ्वीजवळ येणार असून, तो साध्या द्विनेत्री किंवा दुर्बिणीने दिसणार आहे. तो पृथ्वीपासून केवळ ०.१९ खगोलीय एकक एयू अंतरावर हरकुलस तारा समूहाजवळ दिसणार आहे.
- १० तारखेला वृषभ राशीत साऊथ टोरीड उल्का वर्षाव टोरीड तारा समूहाजवळ दिसेल. तर १३ तारखेला रात्री नॉर्थ टोरीड उल्का वर्षाव दिसेल. उत्तर टोरीड उल्का वर्षाव एका लघु ग्रहापासून तर दक्षिण टोरीड उल्का वर्षाव एकने धूमकेतूपासून तयार झाला आहे.
- १३ तारखेला युरेनस ग्रह पृथ्वीजवळ येणार असून, तो साध्या डोळ्यांनी दिसण्याची संधी आहे. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री हा ग्रह साध्या डोळ्यांनी गुरु ग्रहाजवळच दिसणार आहे.
- १४ तारखेला सायंकाळी सूर्य मावळताच चंद्र आणि बुध सोबतच मंगळ ग्रहाची युती दिसेल. विशेष म्हणजे बुध ग्रहाच्या जवळ मंगळ ग्रह सुद्धा पाहण्याची संधी आहे.
-२० रोजी संध्याकाळी चंद्र आणि शनिची युती दिसेल.
- २५ रोजी चंद्र आणि गुरु ग्रहाची युती पाहायला मिळेल.
 

Web Title: Diwali also in the sky in November, Jupiter will come closer to earth, many planetary alliances can be seen with meteor showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.