आली दिवाळी : दिवाळीसाठी १५० चारचाकी तर ३०० दुचाकींचे बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:06 PM2018-11-02T13:06:10+5:302018-11-02T13:07:01+5:30
वाहनांच्या दालनांमध्ये ग्राहकांची गर्दी
जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दीपोत्सवाचे बाजारपेठेत सर्वत्र वेध लागले असून मुहूर्तावर वाहन मिळावे म्हणून वाहनांच्या दालनात ‘बुकिंग’ करण्यासाठी गर्दी होत आहे. गुरुवारपर्यंत १५० चारचाकी व ३०० दुचाकींचे बुकिंग झाली असल्याची माहिती मिळाली.
दिवाळी सणासाठी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्य असून ग्राहकांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. त्यात या वर्षी दिवाळी सण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आला असून या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार असल्याने तसेच अनेक कंपन्यांकडून बोनसही वाटप झाल्याने अनेकांकडून विविध वस्तूंच्या खरेदीचे नियोजन केले जात आहे.
चारचाकींचा तुटवडा
पूर्वी चारचाकी वाहन म्हणजे चैनीची वस्तू समजली जात असे. मात्र आता विविध योजनांमुळे व अर्थसहायाच्या सुविधेमुळे अनेक जण हप्त्या-हप्त्याने चारचाकी खरेदी करण्यास पसंती देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तासाठी गुरुवारपर्यंत एकाच दालनात ९० वाहनांचे बुकिंग झालेले होते. शहरातील एकूण आकडेवारी पाहता ही संख्या १५०वर गेली आहे. मागणीच्या तुलनेत चारचाकी वाहने उपलब्ध होत नसल्याचीही माहिती विक्रेत्यांनी दिली. प्रकाशपर्वाच्या मुहूर्तावरील वाहन साधारण धनत्रयोदशीला घरी आणले जाते. त्यामुळे तोपर्यंत मागणीनुसार वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
योजनांमुळे दुचाकी ‘सुसाट’
दुचाकी खरेदीत ग्राहकांसाठी विविध कंपन्या आकर्षक योजना राबवित असल्याने त्याचा फायदा ग्राहक घेत आहे. दिवाळीसाठी दुचाकी कंपन्यांनी सर्व प्रकारचे मॉडेल, रंग दालनात उपलब्ध करून दिले असून गुरुवारपर्यंत ३०० दुचाकी बुकिंग झाली आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर चारचाकी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जात असून गुरुवारपर्यंत आमच्या दालनात ९० चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.
मनपसंत दुचाकी मिळावी म्हणून आतापासूनच ग्राहक मोठ्या प्रमाणात बुकिंग करीत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सर्व प्रकारचे मॉडेल व विविध रंगात दुचाकी उपलब्ध आहेत. त्यांना पसंती दिली जात आहे.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.