चाळीसगावकरांची पाडवा पहाट निनादली स्वर-तालाने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 11:19 AM2018-11-08T11:19:12+5:302018-11-08T11:26:11+5:30

अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती.

diwali pahat in chalisgaon jalgaon | चाळीसगावकरांची पाडवा पहाट निनादली स्वर-तालाने

चाळीसगावकरांची पाडवा पहाट निनादली स्वर-तालाने

Next

चाळीसगाव, जि.जळगाव -  अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. बनारस घराण्याचे तबला वादक पंडित कालिनाथ मिश्रा, चाळीसगावचे सुपुत्र आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पंडित विवेक सोनार यांच्या स्वर - तालाच्या जुगलबंदीने रसिक - श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, चाळीसगाव नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाचे. 
नगरिषदेच्या आवारात झालेल्या हा  स्वराविष्कार सोहळा प्रारंभापासूनच रंगत गेला. उत्तरोत्तर चाळीसगावकरांची टाळ्यांसह...क्या बात है...!ची दाद वातावरणात गुंजत राहिली.

अहिर भैरव राग अर्थात पुजेने सुरुवात झाली. बासरीच्या कर्णमधुर सुरावटींना तबल्याच्या ठेक्याने चढलेला स्वरसाज प्रत्येकाच्या मन ओंजळीत आनंदाची फुले ठेऊन गेला. रुपक तालात बांधलेल्या तीन तालातील रचनेलाही टाळ्यांची दाद मिळाली. भटियार रागातील रचना, धून आणि शेवटी झालेली 'ओम जय जगदीश हरे' आरतीने सांगता झाली. बासरीवर  हिमांशु गिंडे, राज सोनार आणि तानपु-यावर रितेश भालेराव यांनी साथसंगत केली. आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, नितिन पाटील, विजया प्रकाश पवार, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन जितेंद्र वाघ यांनी केले. 

'बंद मुठ्ठी' ठेक्याने वेधले लक्ष

कालिनाथ मिश्रा यांनी बंद मुठ्ठीने तबल्यावर अप्रतिम तिरकिट वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे हे  बंद मुठ्ठी तबला लालित्य कळसाध्याय ठरले. 

सवाई गंधर्व महोत्सवात गुंजणार 'स्वर विवेक'

यावेळी रसिक - श्रोत्यांशी संवाद साधतांना बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी चाळीसगावच्या मातीशी असलेले आपले ऋणानुबंध उलगडले. जन्मभूमीत कला सादर करायला नेहमीच आवडते असेही सोनार म्हणाले. त्यांना पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात यंदा बासरीचे सूर आळवण्याची संधी मिळाली असून १५ डिसेंबर रोजी पंडित विवेक सोनार हे महोत्सवात बासरी वादन करणार आहेत.

Web Title: diwali pahat in chalisgaon jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.