तोंडापूर येथे शिक्षकांच्या दातृत्त्वातून गरीबांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:50 PM2018-10-21T22:50:58+5:302018-10-21T22:53:10+5:30
तोंडापूर येथील शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या श्रीमती र.सु.जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षकांनी स्वखचार्तून गावातील चाळीस गरीब महिलांना साडी चोळी व मिठाई वाटप केली केली.
तोंडापूर, ता.जामनेर : तोंडापूर येथील शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या श्रीमती र.सु.जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षकांनी स्वखचार्तून गावातील चाळीस गरीब महिलांना साडी चोळी व मिठाई वाटप केली केली. यंदाची दिवाळी फटके मुक्त करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डिगंबर पाटील होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक एम.एस.सुर्यवंशी, प्रभारी सरपंच हमीद शेख, माजी सरपंच नाना पाटील, पर्यवेक्षक डी.एस.पाटील, कैलास कोळी उपस्थित होते
संजय गरुड मल्टीपर्पज फाउंडेशन व श्रीमती र.सु.जैन माध्यमिक विद्यालय तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.एस. सुर्यवंशी यांनी केले. शेंदुर्णी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून दातृत्व हा गुण सदैव अंगी बाळगत जैन विद्यालय हा उपक्रम राबवीत असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यवेक्षक डी.एस.पाटील यांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. दिवाळी फटके मुक्त करण्याची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.संकल्प करते वेळी विद्यार्थ्यांनी एक प्रतिज्ञा पत्र लिहून दिले. त्यानुसार फटाके न फोडता त्यावर होणारा खर्च बचत केला जाईल असे लिहून दिले. जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला. त्यातून एक लाख ४४ हजार ४२८ रुपयांची बचत करण्याचा संकल्प केला.
सूत्रसंचलन आर.सी.लोडते यांनी तर आभार एस.पी.पाटील यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.